आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Distribution Books In Afghanistan Bamian City

तालिबान्यांच्या धमक्यांना न जुमानता शिक्षकांचा गावोगावी प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बामियान- अफगाणिस्तानातील बामियान शहर दहशतवादाच्या सावटाखाली जगत आहे. तेथील सबेर होसिनी नामक शिक्षक गावोगावी जाऊन मुलांना पुस्तक वितरित करत आहेत. त्यांचे ध्येय व्यापक आहे. मुलांना हिंसेपासून परावृत्त करणे आणि स्वत:च्या संस्कृती संवर्धनासाठी ,जगाशी त्यांचा परिचय करून देण्यासाठी सबेर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी यासाठी जीवन समर्पित केले आहे.

सबेर सांगतात की, ‘मी हे काम एकट्याने सुरू केले होते. २०० पुस्तके मी प्रथम वितरित केली होती. आज आम्ही २० जण आहोत. ६ हजार पुस्तकांचा संच आहे. दर आठवड्यात सायकलवर शेकडो पुस्तके लादून आम्ही गावोगाव फिरतो. तालिबान्यांनी बॉम्बस्फोटांसाठी सायकलींचाच वापर केल्याने आम्ही सायकलस्वारीच निवडली. याच सायकलींद्वारे आम्ही संस्कृती संवर्धन व आनंद पसरवत आहोत.’ ते सांगतात, ‘प्रत्येक आठवड्यात आम्ही एका गावातून जुनी पुस्तके घेऊन ती दुसऱ्या गावात वाटतो. अशा पद्धतीने फिरते पुस्तक संग्रहालयच चालवण्यात येत आहे. अधिकाधिक पुस्तके इराणहून मागवली जातात. कारण अफगाणिस्तानात पुस्तकांचे प्रकाशन नगण्यच आहे. प्रत्येक वेळी पुस्तक घेऊन गेल्यावर मुलांशी एखाद्या मुद्यावर चर्चा करतो. शांतीचे महत्त्व सांगण्यासाठी ही चर्चा असते. एकदा मी मुलांना म्हणालो, बंदुकांना नकार द्या. पुस्तकांचा स्वीकार करा. पुढच्या वेळी तिथे गेल्यावर मुलांनी बंदुकीची सर्व खेळणी मला दिली. या मोबदल्यात आम्हाला नवी पुस्तके द्या, असे सांगितले. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता.’ सबेर यांनी या समूहाला किड्स फाउंडेशन असे नाव दिले. या अंतर्गत ते व त्यांचे २० सोबती मोठ्या पुस्तकांच्या पेट्या घेऊन गावोगाव फिरतात.

सबेर यांना यासाठी अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. केवळ इस्लामिक पुस्तके वितरित कर अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही मिळते. या धमक्या तालीबान समर्थक देतात. मात्र पुस्तकांच्या माध्यमातून आपण आनंद देणार, हा त्यांचा अढळ निश्चय आहे. ज्या दहशतीखाली ते जगत आहेत त्याशिवायही जगात अनेक सुंदर गोष्टी आहेत, याची जाणीव करून देण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. या मुलांना त्या जीवनाशी परिचित करून देण्यासाठी ते पुस्तकांना साधन स्वरूप वापरतात.