वॉशिंग्टन- भारतात आधार कार्ड प्रणालीमुळे प्रत्येक महिलेची आेळख निर्माण झाली असून नागरिक म्हणून तिचे योगदान यामुळे सिद्ध होत असल्याचे वुमन्स वर्ल्ड बँकिंगच्या सीईआे मेरी एलेन यांनी म्हटले आहे. बँकिंग आणि अल्प बचतीच्या आर्थिक व्यवहारात महिलांचा वाटादेखील आधार कार्डमुळेच सिद्ध होत आहे. बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन प्रणाली आधारमुळेच हे शक्य झाले. जगात अनेक महिला आर्थिक प्रवाहापासून वंचित आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यांना साधे बँक खातेही उघडणे शक्य नाही. आधार कार्डमुळे भारतातील स्थिती वेगाने बदलली आहे. आर्थिक व्यवहारांत महिला येणे ही जगाची प्राथमिकता असली पाहिजे, असे मेरी एलेन म्हणाल्या. मेरी एलेन अमेरिकेच्या परराष्ट्र समितीसमोर बोलत होत्या.
जगातील प्रत्येक देशात बहुतांश पुरुषांचा अधिकृत डेटा उपलब्ध आहे. मात्र, त्याच्या पत्नीचा डेटा नसल्याने तिचे नागरिकत्व मोघम मानण्यात येते. या सत्राला भारतवंशीय अमेरिकी लोकप्रतिनिधी अॅमी बेरा यांची उपस्थिती होती. त्यांनी डिजिटल इकॉनॉमीचा भारतीय महिलांवर होणारा परिणाम याविषयी मेरी एलेन यांचे मत विचारले. त्यावर मेरी म्हणाल्या की, विमुद्रीकरणाची झळ बहुतांश महिलांना बसली असेल. कारण भारतीय महिला बँकिंग व्यवहार कमी करतात. अनेक कारणांमुळे महिला तंत्रज्ञानापासून वंचित राहिल्याने त्या रोकडमध्ये व्यवहार करत होत्या. शिवाय अनेक महिलांकडे सेल फोन नाहीत. त्यामुळे कॅशलेस इकॉनॉमीसाठी त्यांना तयार करणे आणि तंत्रज्ञानाने व गॅजेटने समृद्ध करणे सध्या आव्हानात्मक आहे. डिजिटलायझेशनचे फायदे महिलांना किती होतील याविषयी आताच सांगता येणार नाही, असे संशोधक तवनीत सुरी यांनी म्हटले.