आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत प्रथमच गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलाचा जन्म, जन्मापासूनच नव्हते गर्भाशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अमेरिकेत प्रथमच गर्भाशयाच्या प्रत्यारोपणानंतर एका मुलाचा जन्म झाला आहे. टेक्सासच्या डलासमधील बॅलोर विद्यापीठ वैद्यकीय केंद्राने सांगितले की, प्रत्यारोपित गर्भाशयामुळे एका महिलेला शुक्रवारी मातृत्वसुख मिळाले. या महिलेला जन्मापासूनच गर्भाशय नव्हते. त्यामुळे ती आई होऊ शकत नव्हती. गेल्या वर्षी तिला एका परिचारिकेने दिलेले गर्भाशय प्रत्यारोपित केले होते. या परिचारिकेचे नाव टेलर सिलर असून ती डलासची राहणारी आहे. आई झालेल्या महिलेच्या इच्छेनुसार तिची आणि तिच्या कुटुंबीयांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. 

 
गर्भाशय दान करणारी परिचारिका सिलरने सांगितले की,‘दोन मुलांच्या जन्मानंतर मला आणखी मूल नको होते. माझ्या गर्भाशयामुळे कोणाला मातृत्वसुख मिळू शकते हे कळल्यावर मी ते दान केले. ज्यांना मुलाची इच्छा आहे, पण त्या आई होऊ शकत नाहीत अशा महिलांना मी ओळखते. मी अशाच एका महिलेला गर्भाशय दान केले. दुसऱ्या कोणाच्या शरीरात माझ्या गर्भाशयाने जन्मलेले मूल दिसले तेव्हा मी खूप आनंदी झाले.’  बॅलोर संस्थेत दीर्घ संशोधनानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १० महिलांनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली होती. तेव्हा रुग्णालयात ४ महिलांना गर्भाशय प्रत्यारोपित केले होते. त्यापैकी तिघींचे गर्भाशय रक्तप्रवाह ठीक नसल्याने काढावे लागले होते. अमेरिकेत आई झालेली ही महिला तेव्हा प्रत्यारोपण झालेल्या महिलांपैकीच एक आहे.  

 

२०१४ मध्ये सर्वात आधी स्वीडनमध्ये प्रत्यारोपण  
सर्वात आधी स्वीडनमध्ये २०१४ मध्ये गर्भाशय प्रत्यारोपणानंतर मुलाचा जन्म झाला होता. भारतात या वर्षी यशस्वीपणे गर्भाशय प्रत्यारोपण झाले आहे.  

 

प्रत्यारोपणाच्या यशाची अपेक्षा २० ते ३५ या वयात जास्त  

बॅलोर रुग्णालयाच्या प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. लिसा जोहान्सन म्हणाल्या की,‘मुलाच्या जन्मामुळे आम्ही सर्वजण आनंदित आहोत. आम्हाला आनंदाश्रू आले. ही चाचणी झालेल्या महिलेचे गर्भाशय सक्रिय नव्हते. या अवस्थेला वैद्यकीय भाषेत मेयर-रॉकीटेंस्की-कॅस्टर-हौजर सिंड्रोम म्हणतात. अशा विकृतीसह जन्मलेली महिला कधीही आई होऊ शकत नाही हा त्याचा अर्थ. अशा महिलांना मातृत्वसुख देण्यासाठीच गर्भाशय प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाते. गर्भाशय दान देणाऱ्या महिलेचे वय ३० ते ६० वर्षे असणे प्रत्यारोपणाच्या यशासाठी अवलंबून आहे. त्याचबरोबर जिला गर्भाशय प्रत्यारोपित करायचे आहे तिचे वयही २० ते ३५ वर्षांदरम्यान असावे.’  

 

 

बातम्या आणखी आहेत...