आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्थापितांचा प्रश्न- रोहिंग्या मुस्लिम वंशसंहाराचे बळी; संयुक्त राष्ट्राचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीनिव्हा- संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे की, म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम हे वंशसंहाराचे बळी ठरत आहेत. म्यानमारमध्ये ते अल्पसंख्याक आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनांच्या परिषदेत ही भूमिका मांडण्यात आली. मानवाधिकार संघटनाचे उच्चायुक्त झैद राद अल हुसेन यांनी म्यानमारमधील वंश संहारावर टीका केली. बुरुंडी, व्हेनेझुएला, येमेन, लिबिया, अमेरिका येथील विस्थापितांच्या प्रश्नांवरदेखील चिंता वाटते, असे झैद म्हणाले. तरुण विस्थापितांविषयी  आणि त्यांच्या संरक्षणाविषयीचा प्रश्न सर्वत्र उग्र रूप घेत अाहे. झैद हे जॉर्डियन राजपुत्र आहेत. सध्या म्यानमारच्या राखीने प्रदेशात सुरू असलेला प्रकार वंशद्वेषाची परिसीमा आहे असे झैद म्हणाले. 
 
संयुक्त राष्ट्र निर्वासित परिषदेने म्हटले आहे की, २ लाख ७० हजार रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमारमधून स्थलांतर केले आहे. गेल्या तीन आठवड्यातील ही आकडेवारी आहे. म्यानमार लष्कर रोहिंग्यांच्या गावांना पेटवत आहेत. मात्र म्यानमार सरकारने म्हटले आहे की, सैन्य नव्हे, तर रोहिंग्या मुस्लिमच वस्त्या पेटवत आहेत. सरकारचा हा दावा साफ खोटा आहे, असे मानवाधिकार संघटनेचे म्हणणे आहे. 

मानवाधिकार संघटनांनाही जाण्यासाठी मज्जाव   
म्यानमार सरकार आणि लष्कराने राखीने प्रदेशात मानवाधिकार संघटन आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांनाही जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे वास्तविकता सांगणे सध्या कठीण झाले आहे. म्यानमारची ही बंदिस्त नीती वंश संहार म्हणूनच नोंदवली जाईल. म्यानमारमध्ये मानवाधिकारांची पायमल्ली होत असल्याचे संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्त  झैद राद अल हुसेन यांनी म्हटले आहे. सिरिया आणि इराकपेक्षाही राखीने प्रांतातील स्थिती भयानक असल्याचे ते म्हणाले.  

जम्मूतून रोहिंग्यांना हद्दपार करण्याची स्थानिक पक्षाची मागणी
जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे विस्थापित रोहिंग्यांना हद्दपार करण्याची मागणी केली आहे. यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवण्यात यावी, अशी मागणी काश्मिरातील या पक्षाने केली. जम्मूमध्ये बांगलादेशी मुस्लिमांनीदेखील मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. त्यांनाही मायदेशी परतण्याचा इशारा जेकेएनपीपीने दिलाय. सध्या केंद्रीय गृहमंत्री  राजनाथसिंह काश्मीरच्या ४ दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जेकेएनपीपीचे नेते हर्षदेव सिंह यांनी रोहिंग्यांना थारा न देण्याची मागणी केली आहे. या विस्थापितांमुळे काश्मीरमधील स्थिती अधिक चिघळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. 

म्यानमारमध्ये मुस्लिमांच्या घरांवर दगडफेक  
मध्य म्यानमारमध्ये स्थानिकांच्या झुंडीने मुस्लिमांच्या घरांवर दगडफेक सुरू केली आहे. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना रबरी गोळ्यांचा वापर करावा लागला. राखीने प्रदेशात रोहिंग्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा परिणाम म्यानमारच्या इतर प्रांतांमध्येही दिसून येत आहे. रविवारी रात्री मॅगवे प्रांतात हिंसा भडकली. येथे बहुतांश बुद्ध नागरिक आहेत. राखीने प्रांतात २७००० बुद्धिस्ट आणि हिंदू असून त्यांनीदेखील उत्तर राखीनेमध्ये आश्रय घेतला आहे. ताउंग ट्विन गी येथील ४०० नागरिकांनी म्यानमारचे राष्ट्रगीत गात मुस्लिमांच्या घरांवर हल्ले केले. स्थानिक मशिदींनाही त्यांनी लक्ष्य केले.
बातम्या आणखी आहेत...