आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाथरूम चोऱ्यांमुळे जर्मन गृह मंत्रालय हैराण, चोरांनी लांबवले नळ, सीट कव्हर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - जगातील शक्तिशाली देशांत जर्मनी पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांची बीएनडी ही जगातील चौथी सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे. तिचे चार हजारांपेक्षा जास्त गुप्तहेर जगभरात आहेत. इतके असूनही जर्मनीचे गृहमंत्रालय व गुप्तचर संस्था आपल्या कार्यालयांतील बाथरूममध्ये होणाऱ्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत.

या चोऱ्यांमुळे गुप्तचर संस्थेची धुरा असलेले जर्मनीचे गृहमंत्री थॉमस द मेजिअरे यांची चांगलीच नाचक्की होत आहे. उत्तरे देताना त्यांची फे फे उडत आहे. बर्लिनमध्ये गृहमंत्रालय आणि बीएनडीचे नवीन कार्यालय बांधण्यात आले आहे. कडेकोट सुरक्षा असलेल्या या इमारतीत गेल्या आठवड्यात चोरांनी हात साफ केले.
गृहमंत्रालयाच्या मजल्यावर बाथरूममधील टाॅयलेट सीट कव्हर व पेपर रोल चोरी गेले. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अशी चोरीची घटना समोर आली आहे. यापूर्वी मार्चमध्ये बीएनडीच्या इमारतीत असलेल्या बाथरूममधून चोरांनी नळाच्या तोट्या लंपास केल्या होत्या.
दोन महिन्यांनंतरही चोरांना पकडण्यात पोलिसांना व गुप्तचर यंत्रणेला यश आले नाही. पुन्हा चोरी झाल्याने सोशल मीडियावर गृहमंत्री थॉमस आणि बीएनडीवर जोरदार टीका होत आहे. ‘आमचे गृहमंत्री कार्यालयातील बाथरूमचे संरक्षण करू शकत नाहीत. देशाचे संरक्षण कसे करतील’ असा प्रश्नही जनता विचारत आहे. थॉमस सध्या माध्यमांना सामोरे जाण्याचे टाळत असल्याचे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

काहीं दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान थॉमस यांना चोरांचा छडा लागला अथवा नाही याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. यावर त्यांनी संतापून प्रतिप्रश्न केला, ‘तुमच्याकडे विचारण्यासाठी प्रश्न नाहीत का?’असे म्हणून ते मुलाखत अर्ध्यावरच सोडून निघून गेले. त्यानंतर पुन्हा त्यांना मुलाखतीविषयी संपर्क साधल्यावर बाथरूमविषयी प्रश्न न विचारण्याची अट त्यांच्या कार्यालयातून घालण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...