आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिहादशी संबंध नाही; म्यानमार रोहिंग्या बंडखोरांनी केला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांगून- जागतिक दहशतवाद्यांशी किंवा जिहादशी आमचा कसलाही संबंध नाही, असे म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम बंडखोरांचे म्हणणे आहे. आपल्या हितासाठी मुस्लिमांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे अावाहन अल कायदाने केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बंडखोरांनी हा दावा केला आहे.  

रोहिंग्यांनी योग्य ते प्रशिक्षण घेतले पाहिजे, योग्य तयारी करायला हवी आणि त्यानंतर आंदोलन करावे, असे अल कायदाने म्हटले होते. त्यावर बंडखोर गटाने हा खुलासा केला. आंतरराष्ट्रीय जिहादशी आमच्या संघर्षाचे देणेघेणे नाही, असे संघटनेने वारंवार स्पष्ट केले आहे. म्यानमारमध्ये बहुसंख्याकांकडून सातत्याने अल्पसंख्याकांना दडपून टाकण्याचे काम केले जात आहे. त्याच्याविरोधात आमचा लढा सुरू आहे. राेहिंग्यांना नागरिकत्व नाकारण्यात आले आहे. त्यामुळेच आमचे आंदोलन आणि संघर्ष आहे, असे बंडखोर अराकन रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी ही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. ही संघटना रोहिंग्या मुस्लिमांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहे. म्यानमार सरकारने रोहिंग्यांच्या विरोधात व्यापक पातळीवर दडपशाही केल्याने रोहिंग्यांना देश सोडण्याची वेळ आली, असा आरोप सरकारवर करण्यात आला आहे. परंतु आँग सान स्यू की यांच्या सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे राखीने प्रांतात इस्लामिक नियमांंना लागू करण्याची मागणी करून हिंसाचार घडवून आणला जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.  
 
नवे शपथपत्र देणार
सरकारने रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्यावरून सर्वोच्च न्यायालयात दाखल शपथपत्र स्थगित ठेवण्याची विनंती केली आहे. आता सरकार नवे शपथपत्र दाखल करणार आहे. सरकारने भूमिकेत बदल केला आहे. रोहिंग्या भारतात राहू शकत नाहीत. कारण त्यांच्यामुळे देशाला सुरक्षेचा धोका आहे. काही रोहिंग्या दहशतवादी संघटनांशी मिळालेले आहेत, अशी गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे, असे अगोदरच्या शपथपत्रात सरकारने म्हटले होते. ही बाब मौलिक अधिकारांत येत नाही. त्यामुळे हस्तक्षेप नको, असे सरकारने म्हटले होते. 
 
बांगलादेशातील निर्वासितांसाठी  भारताकडून जीवनावश्यक वस्तू  
म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या मदतीला भारत धावून आला आहे. बांगलादेशातील निर्वासितांसाठी गुरुवारी सुमारे ५३ मेट्रिक टन जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या आहेत. बांगलादेशने भारताकडे आपली समस्या मांडली होती. त्यानंतर भारताने तातडीने मदतीची पहिली खेप रवाना केली. तांदूळ, डाळी, साखर, मीठ, चहा, नूडल्स इत्यादी पदार्थ पाठवण्यात आले आहेत. ऑपरेशन इन्सानियतअंतर्गत पहिली खेप रवाना झाली आहे. भारत बांगलादेशला ७ हजार टन अन्नधान्य, वस्तूंचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे निर्वासितांची समस्या काही प्रमाणात का होईना सुटू शकणार आहे. सध्या बांगलादेशात ३ लाख ७९ हजार रोहिंग्या मुस्लिम मुक्कामी दाखल झाले आहेत. २५ ऑगस्टच्या हिंसाचारानंतर पलायन करण्यास सुरुवात केली.  
बातम्या आणखी आहेत...