आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Is Threat From ISIS And Al Quida Obama Said In Last Speech As President

नव्या दहशतवाद्यांसाठी पाक, अफगाण ‘सेफ हेवन’ - अाेबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अन्य देश नव्या दहशतवादी नेटवर्कची आश्रयस्थाने बनू शकतात, असा इशारा अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या अखेरच्या भाषणात दिला. अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांना सुरक्षित ठेवण्यासाठी अल कायदा आणि आयएसआयएसचा पिच्छा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ओबामा म्हणाले, अमेरिकेचे विदेश धोरण आयएसआयएस आणि अल कायदाच्या धोक्यावर केंद्रित असायला हवे. एवढेच नव्हे, तर आयएसआयएसशिवाय पश्चिम आशियातील अफगाणिस्तान, पाकिस्तान, मध्य अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील प्रदेशात अनेक दशके अस्थिरता राहील. यातील काही ठिकाणे दहशतवादी संघटनांची आश्रयस्थाने बनतील.

पुढील जानेवारीत कार्यकाळ संपणार
दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात रिपब्लिकन्सना सहभागी होण्याचे आवाहन करत ओबामा म्हणाले, आपण दहशतवादाची समस्या सोडवत असल्याचे लोकांना दिसेल. आपली भूमिका केवळ मोठमोठे वक्तव्य करणे किंवा नागरिकांवर बॉम्बवर्षाव करण्यापेक्षा जास्त परिणामकारक ठरू शकेल. त्यांचे हे राष्ट्राला उद्देशून आठवे भाषण आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आहे. दरम्यान रिपब्लिकन नेते डाेनाल्ड ट्रम्प यांनी अाेबामा यांचे भाषण रटाळ ठरविले अाहे.

काय म्हणाले ओबामा?
- आयएसआयएसविरुद्ध बळाचा जास्तीत जास्त वापर केला जावा, यासाठी काँग्रेसने (अमेरिकी संसद) अधिकार द्यावा.
- काँग्रेसच्या पाठिंब्याने किंवा त्याशिवाय आयएसआयएसला धडा मिळेल.
- तुम्ही अमेरिकींचा पिच्छा केल्यास आम्हीही तुमचा करू, आमची पोहोच अमर्याद आहे.
- अल कायदा, आयएसआयएससारख्या संघटना लोकांच्या डोक्यात विष कालवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत.
- दहशतवादी अमेरिकेच्या सहकारी देशांना कमकुवत करत आहेत. आम्ही आयएसआयएस नष्ट करण्यावर लक्ष केंद्रित
केले आहे.

तासाभराच्या भाषणात ट्रम्प यांच्यावर हल्ला
ओबामा यांनी केलेल्या तासाभराच्या भाषणात अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला. ट्रम्प यांनी सर्व मुस्लिमांना अमेरिका प्रवेशावर बंदीची मागणी केली होती. त्यावर ओबामा यांनी केवळ धर्म आणि वर्णभेदावरून कोणाला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले. त्यांच्या भाषणादरम्यान जवळपास ६४ वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला.

अमेरिकेची आर्थिक स्थिती बळकट
ओबामा यांनी अमेरिकेची अार्थिक स्थिती बळकट ठरवत कपोल्कल्पित आर्थिक घसरण फेटाळली. गेल्या सात वर्षांत प्रशासनाने ठरवलेले आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाले आहे. आर्थिक घसरणीच्या गोष्टी राजकारणाने प्रेरित आहेत. अमेरिका या पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली देश आहे.

६० पेक्षा अधिक देशांचे नेतृत्व
ओबामा म्हणाले, मोठ्या संख्येत बंडखोर अपार्टमेंट, गॅरेजमध्ये कट रचत असून नागरिकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण करीत आहेत. याला आवर घातला पाहिजे. आयएसआयएसचा वित्त पुरवठा समाप्त करणे, त्यांचा कट उधळून लावणे, दहशतवाद्यांचा ओघ कमी करणे तसेच त्यांची विचारसरणी समाप्त करण्यासाठी अमेरिका ६० पेक्षा अधिक देशांच्या आघाडीचे नेतृत्व करत आहे. साधारण १० हजार हल्ल्यांसह त्यांचे नेतृत्व, त्यांचे तेल साम्राज्य, प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रे नष्ट केली जात आहेत. इराक आणि सिरियामध्ये अतिक्रमण केलेल्या भूभागावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलाला प्रशिक्षण, शस्त्र आणि मदत पुरवली जात आहे.