काठमांडू - नेपाळमधील भूकंपात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आश्रय छावणीमध्ये जन्मलेल्या बाळांचे नामकरण सुरू आहे. भूकंपानंतर जन्म झालेल्या अशाच एका बाळाचे नाव ‘लाहोर’ ठेवण्यात आले. हे नाव यासाठी ठेवण्यात आले की, त्याचा जन्म पाकिस्तानी सेनेने बनवलेल्या आश्रय छावणीत झाला.
भारताप्रमाणे पाकिस्ताननेदेखील काठमांडूजवळ भक्तपूरमध्ये छावणी उभारली आहे. आई आणि बाळ संकटाबाहेर आले, तेव्हा बाळाचे नाव ठेवण्यात आले. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम असलम यांनी बाळाचे नाव लाहोर ठेवल्याची पुष्टी केली आहे. पाकिस्तानी सैन्याने ३० बेडचे रुग्णालयही बनवले आहे. नेपाळमध्ये भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, चीन, श्रीलंका, पोलंड, नेदरलँड, जपान, फ्रान्स, तुर्कस्तान, ब्रिटन, मलेशिया,
इस्रायलसह १६ देशांतील सैन्य आणि बचावपथक कार्यरत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश शासनाने नेपाळच्या सीमावर्ती िजल्ह्यांत मानव तस्करीवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संकटाच्या वेळी तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन लहान मुले, महिला यांच्या प्रवेशाकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ६ दिवसपर्यंत पोखरामध्ये अडकले ट्रॅकिंगसाठी गेलेले लोक, भारतीय वायुसेनेने वाचवले.
वारसा टॉवरवरून पडले, सोबत नाही सोडली
१७ वर्षीय प्रमिला आणि २२ वर्षीय संजीव धराहरा टॉवर भागात फिरायला गेले होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. दोघांनी घरच्यांना काहीही सांगितले नव्हते. भूकंप झाला तेव्हा दोघेही टॉवरच्या ८ व्या मजल्यावर होते. दोघेही खाली पडले. परंतु, दोघांनी एकमेकाला पकडून ठेवले होते. दोघांची शुश्रूषा करणारा डॉक्टरही एकच आहे.
८० सेकंदांत ८०० वर्षांचा वारसा ध्वस्त
झालेल्या नुकसानीचा अंदाज घेणे सुरू झाले तेव्हा कळले की, नेपाळमधील ८०० वर्षे जुना वारसा ८० सेकंदांत नष्ट झाला. पुरातत्व विभागाचे संचालक भेष दहल यांनी सांगितले, भूकंपात ५७ पुरातन वास्तू नष्ट झाल्या. त्यांच्या पुनर्निर्माणासाठी अवशेष शोधले जात आहेत. सर्वाधिक हानी काठमांडू, भक्तपूर, पाटन, कीर्तीपूर, बुंगामती, कोकना आणि संखूमध्ये झाली.
पांढऱ्या अक्षरांनी हेल्प लिहून मागितली मदत
पोखरामध्ये काही विदेशी नागरिक ट्रॅकिंगसाठी गेले होते. भूकंपामुळे झालेल्या भूस्खलनाने रस्ते बंद झाले. सहा दिवसांनंतर भारतीय वायुसेनेच्या जवानांनी हेलिकॉप्टरने त्यांना पाहिले आणि काठमांडूला सुरक्षित आणून सोडले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आेसंडून वाहत होता.
भारताने पहाडी भागात दाखवली मदतीची तयारी
भारत सरकारने नेपाळच्या पहाडी भागात नष्ट झालेल्या गावांमध्ये मदत पोहोचवण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि विदेश सचिव एस. जयशंकर यांनी प्रभावित भागाचा दौरा करून पंतप्रधान सुशील कोईराला यांच्याशी चर्चा केली.