आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-मलेशियामध्ये सायबर सुरक्षेसह तीन यशस्वी करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुत्रजया - भारत आणि मलेशियात सायबर सुरक्षेसह तीन द्विपक्षीय करारावर सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समकक्ष नजीब रझाक यांनी करारावर स्वाक्षरी केली.

दोन्ही देशांतील सायबर सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा करार पाच वर्षांसाठी असेल. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात दोन्ही देशांनी परस्परांना प्रकल्प उभारणी, निगराणीसाठी सहकार्य करण्यासंबंधी सहमती दर्शवली. त्यामुळे या क्षेत्रातील संरक्षण वाढण्यास मदत होईल. सायबर हल्ल्याच्या वेळी करावयाचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान सहकार्य इत्यादीच्या धोरणात या करारामुळे फायदा होणार आहे. त्याशिवाय सांस्कृतिक पातळीवरील देवाण-घेवाणीचेही करार झाल्याची माहिती मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी मोदी-नजीब यांच्यात दीर्घ चर्चा झाली. त्यात द्विपक्षीय मुद्द्यासह दहशतवादाच्या समस्येवरदेखील परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या दोन्ही देशांत लोकप्रशासन क्षेत्रात चांगले सहकार्य सुरू आहे. हे पाहून मला निश्चितच आनंद वाटतो. दोन्ही देशांनी भविष्यातही सामरिक पातळीवरी सहकार्य वाढवण्याबद्दल सहमती दर्शवली. दरम्यान, माेदी यांच्या तीन दिवसीय मलेशिया दौऱ्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सायंकाळी ते सिंगापूरकडे रवाना झाले. हा दाैरा तितकाच महत्त्वाचा अाहे.
पायाभूत क्षेत्रातील भागीदारी वाढवावी
भारतातील रस्ते बांधकामाच्या क्षेत्रात मलेशियाचे योगदान आपण सर्व जाणतोच. परंतु आता मलेशियाने देशातील पायाभूत क्षेत्रातील आपली भागीदारी आणखी वाढवावी. सागरी क्षेत्रातही दोन्ही देशांना आर्थिक पातळीवर मोठे सहकार्य वाढवता येऊ शकेल. दोन्ही देश एकाच सागरी मार्गावर आहेत. त्यामुळे व्यापारी वाहतुकीचा फायदा दोन्ही देशांना होईल, असे मोदी म्हणाले.
आज सिंगापूरमध्ये संयुक्त पोस्ट तिकीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समकक्ष ली सिन लूंग यांच्या हस्ते मंगळवारी सिंगापूरमध्ये भारत-सिंगापूर संयुक्त पोस्टल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. उभय देशांच्या मैत्रीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या स्मृतीत हे तिकीट जारी करण्यात येणार आहे. इस्टानामध्ये हा कार्यक्रम होईल. या भेटीत ते राष्ट्राध्यक्ष टोनी याम यांच्याशी चर्चा करतील.
संरक्षणातही सहकार्य
वाढत्या दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन मलेशिया-भारत यांनी संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात परस्परांना मदतीचा हात देण्याचे मान्य केले. उभय देशांच्या पंतप्रधानांनी चर्चेत या मुद्द्यावर सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. दहशतवादाचे आक्राळविक्राळ रूप दिसू लागले आहे. दहशतवादाच्या उच्चाटनासाठी सर्वांना एकत्र येऊन लढा द्यावा लागणार आहे. मलेशिया-भारत यांच्यातील मैत्री त्या दिशेने निश्चितपणे काम करेल असा विश्वास रझाक यांनी व्यक्त केला.