लंडन - सत्ताधारी काँझर्व्हेटिव्ह पार्टीचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन यांचे भवितव्य ठरवणा-या मतदानाला गुरुवारी उत्साहात झाली. विरोधी लेबर पार्टीला सत्तांतराची अपेक्षा असून काही जागांचा निकाल रात्री उशिरापर्यंत, तर अंतिम निकाल शुक्रवारी दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. पंतप्रधान कॅमरोन यांनी पत्नी समांथा यांच्यासह
आपला हक्क बजावला. ऑक्सफोर्डशायर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. विरोधी पक्षनेते एडवर्ड मिलिबँड यांनी वायव्य लंडन येथील मतदान केंद्रावर मतदान केले. पत्नी जस्टिन यांनीही आपला हक्क बजावला. लिबरल डेमोक्रॅट्सचे नेते निक क्लेग, युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टीचे निगेल फारग, स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या निकाेला स्टर्जेन यांचाही सकाळीच मतदान करणा-या नेत्यांमध्ये समावेश होता. देशातील ५० हजार मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली. ५ कोटी मतदार ६५० लोकप्रतिनिधींचे भवितव्य ठरवणार आहेत. दरम्यान, २०१० मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ६५.१ टक्के एवढे मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत काँझर्व्हेटिव्ह आणि लेबर पक्षात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. त्रिशंकू स्थिती पाहायला मिळेल, असा मतदानपूर्व चाचणीचा अंदाज आहे.
महाराणी तटस्थ
देशातील नागरिक लोकशाहीचा हक्क बजावत असताना राजघराण्याच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) मात्र या प्रक्रियेत तटस्थ राहिल्या. त्यांनी कोणत्याही पक्षाला मतदान केले नाही; परंतु शुक्रवारी जनतेच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन करणा-या पक्षाच्या नेत्याची त्या भेट घेतील, असे सांगण्यात आले. २७ मे रोजी संसदेसमोर त्यांचे अभिभाषण होईल. त्यात त्या नवीन सरकारचा अजेंडा मांडतील.
ऑनलाइनची सुविधा
ब्रिटनमध्ये यंदा पहिल्यांदाच मतदारांना ऑनलाइन मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती.