आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मोदी-शरीफ भेट, लख्वी-काश्मीर मुद्यावर होऊ शकते चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उफा (रशिया) - सुमारे एक वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ शुक्रवारी सकाळी परस्परांची भेट घेत आहेत. उफामध्ये सकाळी ९.१५ (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.४५ वजाता) ही भेट होत असून अर्ध्या तासाच्या चर्चेत दोघांत द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानी सूत्रांनुसार, या चर्चेत काश्मीर मुद्दाही समाविष्ट आहे. दुसरीकडे मोदी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी-उर-रहेमान लख्वीच्या अटकेचा मुद्दाही उपस्थित करतील.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते सध्या उफामध्ये आहेत. परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनीही या भेटीला पुष्टी दिली. पाकिस्तानी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने चर्चेचा हा प्रस्ताव ठेवला होता. तो पाकिस्तानने सकारात्मकदृष्ट्या विचार करून मान्य केला.

दुस-यांदा चर्चा : दोन्ही नेत्यांत होत असलेली ही दुसरी औपचारिक चर्चा आहे. यापूर्वी २७ मे २०१४ रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण समारंभानिमित्त शरीफ भारतात आले तेव्हा चर्चा झाली होती.

अगोदर मोदींशी चर्चा तरी होऊ द्या : नवाज शरीफ
गुरुवारी नवाज शरीफ यांना पत्रकारांनी चर्चेसंबंधी विचारले तेव्हा त्यांनी थेट प्रतिक्रिया न देता अगोदर चर्चा तरी होऊ द्या, असे सांगितले. भारत-पाक संबंधांत सुधारणा व्हावी म्हणून ही चर्चा म्हणजे दोन्ही देशांनी उचललेले पाऊल आहे का, या प्रश्नावरही त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

इराच्या राष्ट्रपतींशी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी इराणचे राष्ट्रपती मुहम्मद हसन रुहानी यांची भेट झाली. प्राचीन काळापासून इराणशी भारताच्या असलेल्या संबंधांचा उल्लेख करून मोदी यांनी हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. भारतात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर इराणच्या वरिष्ठ नेत्याशी मोदींची झालेली ही पहिलीच भेट आहे. भारताला आखाती देशातून जे कच्चे तेल आयात केले जाते त्यातील बहुतांश तेल इराणमार्गेच भारतात येते. आगामी काळातील या तेल वाहतुकीच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.