आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये आज मतदान, पुन्हा कॅमेरॉन सरकार येणार काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाआधी कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याचे संकेत नाहीत. सत्तारुढ टोरी पक्ष लेबर पार्टीपेक्षा केवळ एका टक्क्याने पुढे असल्याचा अंदाज आहे. एकाही पक्षाला बहुमत न मिळाल्यास २०१० च्या घटना दुरुस्तीनुसार ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्यांना अन्य पक्षांशी आघाडी करून सरकार स्थापन करता येईल. सध्या टोरी आणि लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे सरकार आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी गेल्या वेळच्या २३ जागाही या वेळी जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

निवडणुकीत युरोपीय संघातील सदस्यत्व, युनायटेड किंगडमचे अस्तित्व, नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे भविष्य आणि आर्थिक कपात यासारख्या मुद्द्यांवर फैसला होणार आहे. सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीची युरोपीय संघाच्या सदस्यत्वावरून सार्वमत घेण्याची इच्छा आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या आश्वासनांना नाकारण्याची दुस-या महायुद्धानंतरची ही दुसरी वेळ आहे.

या धमकीचे काय होणार
ब्रिटन युरोपीय संघापासून विभक्त होत असले तर आम्हीही युनायटेड किंगडमपासून वेगळे होऊ, असा इशारा स्कॉटलंडने दिला आहे. या वेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्कॉटलंडमधील सर्व जागा एसएनपीला मिळतील आणि ते लेबर पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्कॉटलंडमध्ये गेल्यावर्षी स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते.

कसे असेल सरकार
सन २०१० मधील घटना दुरुस्तीनुसार, स्पष्ट बहुमत न मिळाल्यास विविध पक्षांना पाच वर्षांसाठी आघाडी सरकार चालवावे लागेल. दोन तृतीयांश खासदारांच्या सहमतीनंतरच संसद भंग होऊ शकेल. संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ६५० जागा आहेत. सरकार स्थापण्यासाठी ३२६ जागा आवश्यक आहेत.

सत्तेचा स्वाद पुन्हा ?
यंदाच्या निवडणुकीत कॅमरोन यांनी देशभरात फिरून प्रचार केला. बुधवारी अखेरच्या टप्प्यातील एका बैठकीत चहाचा स्वाद घेताना.

कन्झर्व्हेटिव्हकडून भारतीय वंशाचे उमेदवार
सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह भारतीय किंवा आशियातील वंशाच्या व्यक्तीला पंतप्रधान करू शकेल. मात्र, त्यांच्या उमेदवारांच्या यादीवर दृष्टिक्षेप टाकला तर भारतीय वंशाच्या उमेदवारांना लेबर पार्टीच्या बालेकिल्ल्यात उमेदवारी दिल्याचे दिसून येते. क्राॅयडन नॉर्थमधून ट्रान्सपोर्ट कन्सल्टंट विधी मोहन रिंगणात आहेत. या जागेवर लेबर पार्टीचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत येथ्ून लेबरला ५६ टक्के मते तर कन्झर्व्हेटिव्हला २४ टक्के मते मिळाली होती. लेबरचे ज्येष्ठ नेते किथ वाज यांच्याविरुद्ध किशन दवई यांना उभे केले आहे. वाज भारतीय वंशाचे असून १९८७ पासून ते खासदार आहेत. दलविच आणि वेस्ट नॉरवूडही लेबर पार्टीचा गढ आहे. तेथून कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने भारतीय वंशाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.