आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडमध्ये पारंपरिक ब्रेड विक्री घटली, 50 वर्षांपूर्वीच्या ब्रँडचाही संघर्ष सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- गेल्या ५० वर्षांपासून इंग्लंडमधील लोकांच्या ब्रेकफास्ट टेबलवर राज्य करणारे ब्रेड सध्या अडचणीत सापडले आहे. व्यक्ती गरीब असो की श्रीमंत, सर्वच घरांमध्ये मशीनच्या साह्याने तयार करण्यात आलेले “स्लाइस्ड ब्रेड’ ब्रेकफास्टमध्ये अत्यावश्यक असे. मात्र, आता लोकांची या ब्रेडमधील रुची कमी होत आहे. मशीनमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रेडऐवजी हाताने तयार करण्यात आलेल्या ब्रेडला येथे जास्त पसंती मिळत आहे. इंग्लंडमधील एकंदरीत सर्वच प्रकारच्या ब्रेडच्या विक्रीत घट नोंदवण्यात आली आहे. मात्र, सर्वाधिक घसरण इंग्लंडमध्ये जास्त तयार होणाऱ्या व्हाइट ब्रेडच्या विक्रीमध्ये नोंदवण्यात आली आहे. 

इंग्लंडमध्ये १९६० च्या दशकात ब्रेडच्या मोठ्या प्रमाणात निर्मितीला सुरुवात झाली होती. “कन्झ्युमर बिहेविअर अॅनालिटिक्स फर्म कांटर वर्ल्ड पॅनल’च्या अहवालानुसार २०१६ मध्ये ब्रेडची विक्री ०.७ टक्क्यांनी कमी होऊन ३०,८३२ कोटी रुपयांवर आली आहे.  तर “रॅप्ड स्लाइस्ड ब्रेड’च्या विक्रीमध्ये घसरण त्यापेक्षाही जास्त ३.७ टक्के नोंदवण्यात आली आहे. या विक्रीची आकडेवारी कमी होऊन ११,६७० कोटी रुपयांवर आली आहे. 

तर देशात सर्वात जास्त विक्री होणारे ब्रँड “वारबर्टन’ची विक्री १२.२ टक्क्यांनी कमी होऊन ३,८९३.१८ कोटी रुपये राहिली आहे. टक्केवारीचा विचार केल्यास यात ११ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. याचप्रमाणे “हाेव्हिस’ ब्रँडच्या विक्रीमध्ये ४.२ टक्के आणि “किंग्जमिल’ ब्रँडच्या विक्रीमध्ये १.४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

ही सर्व आकडेवारी “द ग्रॉसर’मध्ये प्रकाशित झाली आहे. सध्या कंपन्यांनी ब्रेडवरील साखरेची कोटिंग करणेदेखील बंद केले असल्याचे यात सांगण्यात आले आहे. असे असले तरी विक्रीसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अलीकडच्या काळात लोकांमध्ये वजन कमी करण्याविषयी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. तसेच लोक कार्बोहायड्रेटविषयी अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे आधीपेक्षा सध्या ब्रेडची विक्री कमी झाली आहे, तर दुसरीकडे गहू आणि ब्रेडमध्ये असलेल्या ग्लुटेनची अॅलर्जी होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे ब्रेडच्या विक्रीत आणखी घट होत आहे.
 
 कान्टरच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ग्लुटन-फ्री ब्रँड “जीनियस’च्या विक्रीत ५२.१ टक्के तसेच किमतीच्या बाबत ४२.२ टक्के वाढ झाली असून विक्री वाढून ७७.५० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. 
 
ब्रेकर्सदेखील आपल्या ब्रेडची विक्री वाढवण्यासाठी कार्बोहायड्रेट, जास्त प्रोटीन्स असलेले ब्रेड बनवण्यासोबतच नवनवीन क्लृप्त्या शोधत आहेत. लोकांनी मशीनऐवजी हाताने नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ब्रेडला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असल्याचे इंग्लंडमधील सुप्रसिद्ध कुकरी शो “बेक ऑफ’चे शेफ पॉल हॉलीवूड यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...