आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची कामगिरी चांगली असूनही जगाकडून दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर स्तुतिसुमने उधळली आहेत. भारत अनेक क्षेत्रांत चांगली कामगिरी करत आहे; परंतु अनेक बाबतीत क्षमता असूनही जगाचे भारताकडे म्हणावे तितके लक्ष गेलेले नाही, असे ट्रम्प यांना वाटते. भारत आणि चीन या विकसनशील देशांबद्दलचे मत व्यक्त करताना ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली.
भारत अनेक क्षेत्रांत चांगली कामगिरी करत आहे; परंतु कोणीही त्याबद्दल बोलायला तयार नाही. ते सीएनएनशी बाेलत होते. आपल्या भाषणातून ६९ वर्षी ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, जपान यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. सीएनएनला २००७ मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्येही ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली होती. जगात अमेरिकेचे स्थान कसे असेल, या प्रश्नावर त्या वेळच्या मुलाखतीमध्येही हेच मत व्यक्त केले होते. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचार मोहिमेला गेल्या वर्षी सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी पहिल्यांदाच भारताबद्दलची भूमिका मांडली आहे. चीन आणि भारताची ती सुरुवात होती; परंतु भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारताची कामगिरी मला चांगली वाटते.

रिअलइस्टेटमध्ये रस : भारताबद्दलट्रम्प यांना आकर्षण वाटण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यापैकी एक आहे रिअल इस्टेट. भारतातील रिअल इस्टेटमध्ये ट्रम्प यांनी चांगलाच रस असल्याचे सांगितले जाते. या क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याने वैयक्तिक पातळीवर फायदा होऊ शकतो, याची ट्रम्प यांना चांगली जाण आहे. दुसरीकडे हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर जणू शिक्कामोर्तब केले आहे. २०२४ पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सरासरी टक्के होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. हाच सूर ट्रम्प यांनी धरून हे वक्तव्य केले.

ट्रम्प आणि संघाची मानसिकता सारखीच, काँग्रेसचा आरोप
डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची मानसिकता सारखीच आहे, असा आरोप काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या सभेतून एका शीख व्यक्तीला हाकलून देण्यात आले होते. त्यावरील प्रतिक्रियेत ते म्हणाले, ही वागणूक ट्रम्प यांच्या एकाधिकारशाही मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखेच त्यांचे विचार आहेत. संघाला विविधता, समानता, स्वातंत्र्य मूल्यांचे महत्त्व नाही. या मूल्यांच्या विरोधातील ही मानसिकता आहे, असा आरोप दीक्षित यांनी केला आहे.

मुंबईत ७५ मजली टॉवरचे स्वप्न, ८०० फुटांची गगनचुंबी इमारत
राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या ट्रम्प यांना भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईत गगनचुंबी रहिवासी मनोरा उभारायचा आहे. २०१४ मध्ये त्यांनी ‘ट्रम्प टॉवर मुंबई’ची घोषणा केली होती. ही ७५ मजली अर्थात ८०० फूट गगनचुंबी इमारत असेल. त्यात तीन आणि चार खोल्या-शयनकक्ष, स्वयंपाकघर,ऑटोमॅटिक टॉयलेट याचा समावेश असलेल्या अपार्टमेंटचा समावेश असेल. सुमारे १० लाख ६० हजार डॉलर अशी अपार्टमेंटची किंमत असेल. त्या अगोदर २०१२ मध्ये ट्रम्प नावाने पुण्यात टॉवर बांधण्याचे जाहीर झाले होते.