आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापनेसाठी काम करावे: पोप फ्रान्सिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅटिकन सिटी - डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात शांतता नांदवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे व्हॅटिकन सिटीमधील भेटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार पोप आणि ट्रम्प यांच्यादरम्यान सौहार्दपूर्ण चर्चा झाली.
 
मध्यपूर्वेमध्ये अल्पसंख्याक असलेल्या ख्रिश्चन धर्मीयांवर अनन्वित अत्याचार होत असल्याबद्दल दोघांनीही चिंता व्यक्त केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी ट्रम्प यांना ऑलिव्ह ऑइलचे वृक्ष कोरलेले पदक भेट म्हणून दिले. हे पदक जागतिक शांततेचे प्रतीक आहे. ‘हे मी तुम्हाला देत आहे. कारण तुम्ही तुमच्या पदाचा वापर शांतता प्रयत्नांसाठी करणे मला अपेक्षित आहे’, असे पोप यांनी स्पॅनिश भाषेत सांगितले.
 
ट्रम्प यांनी पोप यांना अनेक भेटवस्तू दिल्या. मार्टिन ल्यूथर किंग यांची ब्राँझची प्रतिमाही यात होती. तर पोप यांनी स्वत: लिहिलेली पुस्तके ट्रम्प यांना भेटस्वरूपात दिली. पैकी हवामान बदलाच्या समस्येवरील पुस्तक महत्त्वाची भेट ठरले. कार्बन उत्सर्जनावर पोप यांनी पॅरिस कराराच्या वेळीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. या समस्येकडे पोपनी ट्रम्प यांचे लक्ष वेधले. ट्रम्प यांची भूमिका विरोधी असल्याने ही भेट विशेष उल्लेखनीय ठरली.  
 
पोप आणि ट्रम्प भेटीच्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे की, ‘मानवी जीवन, धार्मिक स्वातंत्र्य आणि कर्तव्याची जाणीव’ या तीन मूल्यांशी कटिबद्ध राहण्याचे वचन धार्मिक आणि राजकीय नेत्याने घेतले आहे.

ट्रम्प यांच्या वजनावरून मिश्कील चर्चा   
फर्स्ट लेडी मेलानिया यांच्याशीदेखील पोप यांनी अनौपचारिक संवाद साधला. ‘तू डोनाल्ड यांना काय खाऊ घालतेस? पॉक्टिका  खाऊ घालतेस का?’ असे मिश्किलीने पोप यांनी फर्स्ट लेडीला विचारले. मेलानिया या मूळच्या सॉल्व्हेनियाच्या आहेत. पॉक्टिका तेथील प्रसिद्ध केक असल्याने पोप यांनी मिश्किलीने हा प्रश्न विचारला. ट्रम्प यांच्या वजनाकडे त्यांनी मेलानियाचे लक्ष वेधले. मेलानिया यांनीही विनोदबुद्धीने उत्तर दिले की, त्यांना पिझ्झा अधिक आवडतो. ट्रम्प यांचे फास्टफूड प्रेम हे अमेरिकेतही बातमीचा विषय ठरले होते.
बातम्या आणखी आहेत...