आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आणखी संयम शक्य नाही; ट्रम्प यांचा उत्तर कोरियाला इशारा; जपानचे उत्तर कोरियावर निर्बंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानमध्ये पुन्हा एकदा उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, उत्तर कोरियाशी रणनीतिक संयम ठेवण्याचे युग आता संपले आहे. आता आम्ही आणखी संयम बाळगू शकत नाही. जपानचे पंतप्रधान शिंंजो अॅबे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम हा जग, आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य यासाठी धोकादायक असल्याची टिप्पणी केली.
  
तत्पूर्वी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्याबाबत थोडी सौम्य भूमिका दाखवत ट्रम्प म्हणाले की, मी कोणाशीही चर्चा करू शकतो. मी त्याला कमजोरी किंवा मजबुती मानत नाही. लोकांशी चर्चा करणे, त्यांच्यासोबत बसणे काही चुकीचे नाही. मी त्यासाठी निश्चितपणे खुला आहे. पण आपण चर्चा करण्यासाठी कुठे जात आहोत हेही पाहायला हवे.  
 
 
दक्षिण कोरियाचे उत्तर कोरियावर एकतर्फी निर्बंध  
 
दक्षिण कोरियाने उत्तर कोरियावर एकतर्फी निर्बंध घालण्याची घोषणा सोमवारी केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सेऊल दौऱ्यावर येण्याच्या एक दिवस आधीच हा निर्णय जाहीर करण्यात आला. दक्षिण कोरिया सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चीन, रशिया आणि लिबियातील उत्तर कोरियाच्या १८ बँकर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकर्सनी परदेशात उत्तर कोरियाच्या बँकांचे प्रतिनिधित्व केले होते तसेच अण्वस्त्र विकसित करण्यासाठी लागणाऱ्या निधीचा पुरवठा केला होता, असे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या सर्व १८ बँकर्सवर अमेरिकेने यापूर्वीच निर्बंध घातले आहेत. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी सेऊलच्या दौऱ्यावर येणार असून त्याआधीच एक दिवस दक्षिण कोरियानेही निर्बंधांची घोषणा केली आहे. हे निर्बंध घालण्यात आल्याने दक्षिण कोरियातील व्यक्ती किंवा संस्था यांना यादीतील १८ बँकर्सशी कुठलाही व्यवहार करता येणार नाही. सध्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात कुठलेही आर्थिक संबंध नाहीत. त्यामुळे हे निर्बंध सांकेतिक मानले जात आहेत. 
 
जपानचेही उत्तर कोरियावर निर्बंध
जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनीही ट्रम्प यांच्या उत्तर कोरियाबाबतच्या वक्तव्याला दुजोरा दिला. उत्तर कोरियाच्या धमकीला उत्तर देण्यासाठी आमच्यासमोर लष्करी कारवाईसह सर्व पर्याय खुले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अॅबे यांनीही उत्तर कोरियावर निर्बंध घालण्याची घोषणा करताना उत्तर कोरियाचे ३५ गट आणि व्यक्तींवर निर्बंध घातल्याचे जाहीर केले. क्षेपणास्त्रांच्या चाचण्या आणि सहाव्या अणुचाचणीनंतर संयुक्त राष्ट्रांनीही उत्तर कोरियावर निर्बंध घातले आहेत.
बातम्या आणखी आहेत...