आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्की बाॅम्बस्फोटाने हादरले, जवानांसह ५ पोलिस ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल- तुर्कीची राजधानी सोमवारी गोळीबार आणि बाॅम्बस्फोटाने हादरली. शहराच्या आग्नेय भागात झालेल्या स्फोटांत किमान ४ पोलिस, तर १ सुरक्षा जवान ठार, तर १० जखमी झाले. हल्लेखोरांनी अमेरिकेच्या वाणिज्यदूत कार्यालयालादेखील लक्ष्य केले. कुर्दीश बंडखोरांकडून हल्ला झाल्याचा संशय आहे.
अमेरिकेच्या वाणिज्यदूत कार्यालयाबाहेर गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. परंतु त्यात सुदैवाने कोणी जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही. सिरनक प्रांतात रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात ४ पोलिस ठार झाले. हल्लेखाेरांनी लष्करी हेलिकॉप्टरवर केलेल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला. त्या अगोदर शनिवारी रात्री सुल्टानबेइली येथील पोलिस ठाण्यावर स्फोटकांनी भरलेली कार धडकवून उडवून देण्यात आली. त्यात १० पोलिस जखमी झाले. जखमींमध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन संशयित दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ही चकमक रात्रभर सुरू होती. सोमवारी सकाळी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. घटनेतील जखमीपैकी एका पोलिस अधिकाऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तुर्की सरकार आणि कुर्दीश बंडखोर यांच्यात वाढलेल्या तणावातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आयएसच्या कारवाया वाढल्या, तालिबानही सक्रिय
आयएसविरोधातील भूमिकेचा तुर्की सरकारला फटका
अलीकडे तुर्की सरकारने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग घेतल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर तुर्की सरकारला उत्तर देण्याचा प्रयत्न आयएसने कुर्दीश बंडखोरांना हाताशी धरून केल्याचे सांगितले जाते.

गेल्या महिन्यात कारवाई
सरकारी फौजांनी उत्तर इराकमधील कुर्दीश बंडखोरांचे तळ आणि आयएसच्या तळांवर गेल्या महिन्यात हवाई हल्ले केले होते.

महिला अतिरेक्याला अटक
अमेरिकेच्या इस्तंबूलमधील वाणिज्यदूत कार्यालयाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांमध्ये एक महिला अतिरेकी असून तिला जिवंत पकडण्यात आले आहे. हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात अाहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु गेल्या पंधरवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांत २० जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या हल्ल्यांची जबाबदारी पीकेके नावाच्या कुर्दीश संघटनेने घेतली होती.

काबूल विमानतळ मार्गावर स्फोट
काबूल- अफगाणिस्तानच्या राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर सोमवारी भीषण स्फोट झाले. विमानतळाच्या तपास चौकीला त्यात लक्ष्य करण्यात आले. त्यात मोठी प्राणहानी झाल्याचे सांगण्यात येते. परंतु घटनेत ५ ठार १६ जखमी झाल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मुल्ला अख्तर मन्सूर तालिबानचा म्होरक्या झाल्यापासून अफगाणिस्तानातील हिंसाचारात वाढ झाली आहे.