आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाण संसदेवर हल्ला, आत्मघातकी हल्लेखोरासह सात जणांचा खात्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - तालिबानने सोमवारी अफगाणिस्तानच्या संसदेवर आत्मघातकी हल्ला केला. संसदेच्या आतमध्ये व बाहेर दोन तास चाललेल्या कारवाईत आत्मघातकी हल्लेखोरासह सात तालिबानींचा खात्मा करण्यात आला. या घटनेत एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. सभागृहातील सर्व खासदारांचे प्राण वाचवण्यात आले. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सरवर दानिश नवनियुक्त संरक्षणमंत्री मासू स्टँकजई यांची ओळख सभागृहाला करून देताना हा हल्ला झाला. यानंतर मतदानाद्वारे नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार होते. कामकाजाचे थेट प्रसारण सुरू होते.

संसदेच्या प्रवेशद्वारावर स्फोटकांनी भरलेल्या कारचा स्फोट करण्यात आला आणि त्यानंतर हल्लेखोरांनी आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती काबूल पोलिसाचे प्रवक्ते इबादुल्लाह करिमी यांनी दिली. सात जणांच्या हल्ल्यात ३७ नागरिक जखमी झाले.

जखमींमध्ये पाच महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने दूरध्वनी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. नव्या संरक्षणमंत्र्याची नियुक्ती रोखण्यासाठी हा हल्ला केल्याचे तो म्हणाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाण संसदेवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

२०१२ मध्येही झाला हाेता हल्ल्याचा प्रयत्न
तालिबानने एप्रिल महिन्यापासून सरकार आणि विदेशी संस्थांवर हल्ले सुरू केले आहेत. अफगाण धर्मगुरूंनी रमजानच्या काळात तालिबान्यांना हल्ले न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत हा सोमवारचा हल्ला करण्यात आला. २०१२ मध्ये आत्मघातकी अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय अनेक दूतावासांना लक्ष्य करण्यात आले होते.

स्थानिक फौजांना आव्हान कायम
२००१ मध्ये अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील आक्रमणात तालिबानची सत्ता उलथवण्यात आली होती. यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत नाटोच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून होत्या. या फौजा परतल्यानंतर स्थानिक सुरक्षा जवानांसमोर अफगाणिस्तानच्या सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे.

सभापतींना वाटले, विजेशी संबंधित आवाज
स्फोटानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. खासदार मोठमोठ्याने ओरडू लागल्याचे टीव्ही फुटेजवर दिसले. सभापती अब्दुल रऊफ इब्राहिम आपल्या जागेवर बसलेले होते. त्यांनी विजेशी संबंधित घटना असल्याचे सांगत खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. स्फोटावेळी कक्षात असलेले खासदार मोहंमद रझा खोसक यांनी अनेक लहान धमाके झाल्याचे सांगितले. काही सेकंदांत सभागृहात धूर पसरला आणि त्यानंतर खासदार बाहेर पडण्यासाठी सैरावैरा पळू लागले.

दोन जिल्ह्यांवर तालिबानचा कब्जा
अफगाणिस्तानच्या उत्तरेतील कुंदुज राज्यातील दोन जिल्ह्यांवर तालिबानने काही दिवसांपूर्वी कब्जा केला आहे. राज्य परिषदेचे प्रमुख मुहंमद युसुफी म्हणाले, तालिबानींनी दश्ती आर्ची जिल्ह्याला चहुबाजूंनी वेढा देऊन त्यावर नियंत्रण मिळवले. तिथे किती लोकांना ठार करण्यात आले याची माहिती समोर आली नाही. मात्र, तेथून १५,००० जणांना बाहेर पडता आले नसल्याचे सांगण्यात येते. तालिबानने हा जिल्हा आणि लष्कराच्या शस्त्रसाठ्यावर नियंत्रण मिळवले आहे.

सर्व भारतीय सुरक्षित
अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत अमर सिन्हा यांनी रात्री उशिरा टि्वट करून भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले. सर्व हल्लेखोरांना ठार केल्यानंतर त्यांनी हे टि्वट केले.
बातम्या आणखी आहेत...