आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानांवर दगडफेक; अतिरेक्यांचे पलायन, दोन अतिरेक्यांना पकडण्यास गेले होते लष्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
श्रीनगर - काश्मीरच्या शोपिया येथे सोमवारी अतिरेक्यांच्या विरोधात लष्कराने  मोहीम  सुरू केली.  या वेळी स्थानिक लोकांनी जवानांवर दगडफेक सुरू करून निदर्शने केली. यामुळे तेथून अतिरेक्यांना पळून जाण्याची संधी मिळाली. लष्कर त्यांचा शोध घेत आहे. सुरक्षा दलास शोपियाजवळील पंजुरा गावात दोन अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण गावास घेरले. लष्कराने शोधमोहीम सुरू करताच लोक घरातून बाहेर पडले. त्यांनी जवानांवर दगडफेक सुरू केली. यादरम्यान भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. सुरक्षा जवानांचा जमावांशी तोंड देण्यातच वेळ गेला. शेवटी या जमावास पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने बळाचा वापर केला. याच परिस्थितीचा फायदा घेत दाेन अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर जवानांच्या सर्च ऑपरेशनमध्ये या अतिरेक्यांना शोधण्यात अपयश आले. काश्मीरमध्ये लष्करांकडून अतिरेक्यांना पकडताना तेथील नागरिक नेहमी अडथळे आणतात. दोन दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला होता, परंतु सुरक्षा दलाने जागेवरच घेराव घालून दोन अतिरेक्यांना ठार केले. 
 
अतिरेक्यांच्या जनाजाच्या वेळी उसळली गर्दी
श्रीनगर| काश्मीरमधील तराळ भागात मारल्या गेलेल्या हिजबुलचा स्थानिक कमांडर आकिवच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पुलवामा आणि तराळ परिसरातील अनेक गावे बंद होती. सोमवारी अतिरेक्याचा मृतदेह त्याच्या पालकांना देण्यात आला. त्यानंतर त्याचा दफनविधी करण्यात आला. त्याच्या जनाजास नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.  या वेळी सुरक्षा दल आणि देशाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सुरक्षा दलाने दीर्घकाळ चकमक चालू ठेवून अतिरेक्यास मारले होते. यामध्ये दोन अतिरेकी मारले गेले.  त्यांचे मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आले.  काश्मिरात तणावाचे वातावरण असून सोमवारीही बंद कायम होता. 
 
सैनिकाची आत्महत्या
जम्मू  | पूंछ जिल्ह्यातील लोअर कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सैनिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर पुढील कारवाई केली. त्याने असे कृत्य का केले याचा खुलासा झालेला नाही. प्राप्त माहितीनुसार, मृत रोशनसिंग लाेअर कृष्णा घाटी सीमेवर तैनात होता. रात्री कामावरून परतल्यानंतर सर्व्हिस रायफलमधून त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून इतर जवान त्याच्याकडे धावले. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झालेले होते.
बातम्या आणखी आहेत...