आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे शांतिपर्व: १.३७ काेटींच्या देशापुढे 'महासत्ता' अखेर नमली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- तब्बल ५५ वर्षे ज्यांच्यात विस्तवही आडवा जात नव्हता त्या अमेरिका आणि क्युबा या दोन्ही देशांच्या इतिहासात या सोमवारची विशेष नोंद होईल. जागतिक महासत्ता अमेरिकेने जगाच्या नकाशावर अगदीच इवलासा असलेल्या क्युबाशी जुळवून घेतले आहे. याचाच परिणाम म्हणून १९६१ नंतर प्रथमच वॉशिंग्टनमधील हवानाच्या वकिलातीवर क्युबाचा लाल, पांढरा आणि निळा रंग असलेला झेंडा डौलाने फडकू लागेल.

सोमवारी सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच क्युबाचा राष्ट्रध्वज अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या भव्य संगमरवरी प्रवेशद्वारावरील जगभरातील देशांच्या राष्ट्रध्वजाच्या रांगेतही जागा घेईल.

क्युबावर निर्बंध टाकण्यापासून या देशाला नमवण्यासाठी अमेरिकेने वर्षानुवर्षे डावपेच आखले. परंतु अवघी १ कोटी ३७ लाख लोकसंख्या असलेल्या क्युबाने जिद्दीने त्याला तोंड दिले. ज्या व्हाइट हाऊसमधून हे घडले, त्या इमारतीपासून क्युबाची वकिलात हाकेच्या अंतरावर आहे हे विशेष. आणखी एक ऐतिहासिक क्षण असा की, अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी क्युबाचे परराष्ट्रमंत्री ब्रुना रोड्रिग्ज यांचे चर्चेसाठी स्वागत करतील. चर्चेनंतर दोघे संयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहेत.

१९६१ नंतर प्रथमच अमेरिका-क्युबा संबंध पूर्वपदावर

शत्रूशी मैत्रीचा अमेरिकी हेतू काय?
शीतयुद्धाच्या काळातील कटुता संपुष्टात आणून क्युबातील लोकांचे संरचनात्मक सहभागाने सक्षमीकरण करायचे असल्याचे सांगत अमेरिका जुळवून घेत आहे. परंतु कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचारात क्युबाने केलेले मूलभूत संशोधन व अमेरिकेत अशा रोग्यांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर अमेरिकेला ही मैत्री हवी आहे.

...आणि शत्रुराष्ट्रे बनली मित्रराष्ट्रे
पाच दशकांहून अधिक काळापासूनची दोन्ही देशांतील संबंधांची कोंडी गेल्या डिसेंबरमध्ये फुटली व इतक्या वेगाने हालचाली झाल्या की शत्रु राष्ट्रे आता मित्र झाले आहेत.

पण हे वाटते तेवढे सोपेही नाही...
दोन्ही देशांनी आज हातात हात घेतले असले तरी हे शत्रुत्व संपवून नवी सुरुवात करणे तेवढे सोपे नाही. अनेक मुद्द्यांवर दोघांनाही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. आम्ही डोळ्यात डोळे टाकून पाहू शकणार नाही, असे अनेक मुद्दे आहेत, असे अमेरिकी प्रवक्ते जॉन किरबी यांनी मान्य केले.
क्युबाला काय हवे?

>क्युबाची अर्थव्यवस्था सध्या ढेपाळत चालली आहे. अशा काळात आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचे इंजिन म्हणून अमेरिकेची मदत हवी आहे.

>अमेरिकेशी मैत्रीमुळे कोणत्याही राजकीय सुधारणा न करताच परदेशी गुंतवणूक व समाजवादी मॉडेलच्या आधुनिकीकरणासाठी मानवी भांडवलाचा ओघ वाढेल, अशी क्युबाची धारणा आहे.

कॅस्ट्रो-ओबामांचे हातात हात
गेल्या १७ डिसेंबर रोजी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा व क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी द्विपक्षीय संबंध सुरळीत व्हावेत म्हणून सकारात्मक पावले टाकली. नंतर हवाना-वॉशिंग्टनमध्ये यानंतरच्या काळात चर्चेच्या फेऱ्या झडत राहिल्या आणि अवघ्या सात महिन्यांत या देशांतील शत्रुत्व संपले.
अडचण काय? : सन १९५९ मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी देशात क्रांती घडवून सत्ता स्थापल्यावर अमेरिकी मालमत्ता व संपत्तीवर टाच आली. या प्रकरणी आजही ५,९११ खटले अमेरिकेत दाखल आहेत. याची किंमत अंदाजे ७ ते ८ अब्ज डॉलर आहे. दोन्ही देशांतील संबंधात हा अडसर ठरू शकतो.
बातम्या आणखी आहेत...