आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांना फाशी देणारच: पाकचा तडजोडीस नकार; पाकिस्तानी लष्करी जनरल्सच्या परिषदेचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)
इस्लामाबाद- भारताचे माजी नौदल अधिकारी आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र कुलभूषण जाधव यांना फाशी दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम भारताने देऊनही जाधवांच्या फाशीच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करायची नाही, असा निर्णय पाकिस्तानी लष्कराच्या ज्येष्ठ जनरल्सनी गुरुवारी घेतला.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली रावळपिंडीत झालेल्या कॉर्पस कमांडर्सच्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स या पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम शाखेच्या निवेदनात म्हटले आहे. कॉर्पस कमांडर्स परिषदेत पाक लष्कराच्या जनरल्सना जाधवांबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली. त्यानंतर या ‘राष्ट्रद्रोही’ मुद्द्यावर कोणतीही तडजोड करू नये, असा निर्णय झाला.

कॉर्पस कमांडर्स परिषद ही पाकिस्तानी लष्कराची महत्वाचा उच्चस्तरीय फोरम असून त्यात सर्व कॉर्पस कमांडर्स आणि लष्करातील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या परिषदेचा निर्णय संक्षिप्त निवेदनाद्वारे जाहीर केला जातो. परंतु तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. ४६ वर्षीय कुलभूषण जाधव यांना रॉचा हेर ठरवून पाकिस्तानमध्ये हेरगिरी व विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपाखाली फील्ड जनरल कोर्ट मार्शलमध्ये दोषी ठरवले आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या शिक्षेवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी शिक्कामोर्तब केले आहे.  

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी भारतातील पठाणकोट आणि उरीमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आधीच भारत- पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहेत. जाधवांच्या प्रकरणामुळे ते आणखीच ताणले गेले आहेत. जाधवांना फाशीची शिक्षा दिल्यास ही सुनियोजित हत्याच ठरेल आणि पाकिस्तानला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे.

संयुक्त राष्ट्राचे मौन...
भारत आणि पाकिस्तानने उभयपक्षी समस्यांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढवा, अशी सूचना करतानाच संयुक्त राष्ट्राने जाधवांना पाकने ठोठावलेल्या फाशीच्या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. या प्रकरणात आम्ही कोणतीही भूमिका घेण्याच्या स्थितीत नाही, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे.

भामरेंचा इशारा...
पाकने कुलभूषण जाधव यांना फाशी दिल्यास तो भारतीय नागरिकाचा खून म्हणून गृहीत धरून कारवाई करू, असा इशारा संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी मंुबईत बाेलताना दिला.

पाकचे भारताकडे बोट...
पाकचा माजी लष्करी अधिकारी ले. कर्नल हबीब झहीर ६ एप्रिल रोजी नेपाळमध्ये भारतीय सीमारेषेजवळून गायब झाला. ‘परदेशी गुप्तचर’ संस्थांनी त्याला जाळ्यात ओढून अपहरण केले, असे पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

जाधवांचा पत्ता नाही : भारत
नवी दिल्ली- जाधव यांचा पाकिस्तानमधील ठावठिकाणा किंवा त्याची नेमकी काय अवस्था आहे, याबद्दल कोणतीही माहिती नाही. या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही पाकच्या संपर्कात आहोत, असे भारताने म्हटले आहे. जाधवांशी राजनैतिक संपर्क साधण्यासाठी पुन्हा एकदा विनंती केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...