आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतीखाली अफगाणी मुलींचे स्केटिंग प्रेम फुलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - दहशतवादी कारवायांमुळे जेरीस आलेल्या अफगाणिस्तानातील मुलींमध्ये आता स्केटिंगची क्रेझ वाढताना दिसत आहे. काबूलमध्ये स्केट पार्कमध्ये त्याची झलक आपल्याला पाहावयास मिळते. तेथे देशाच्या विविध भागांतून आलेल्या मुली त्यांचे स्केटिंगचे कौशल्य सादर करताना दिसतात.
त्यामुळे या परिसराला "स्केटिस्तान' असे नाव देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हर पेर्कोव्हिच यांनी या पार्कची निर्मिती केली आहे. तालिबानच्या दहशतवादी धमक्या व कारवायांमध्ये भरडून निघालेल्या अफगाणिस्तानातील मुलींना साधी सायकल चालवण्याचीदेखील मोकळीक नाही. त्यामुळे स्केटिंगसारखा वेगळा प्रकार येथे रुळणार नाही किंवा त्याला परवानगी मिळेल असा विचारही काही िदवसांपूर्वी केला जाऊ शकत नव्हता. परंतु आता तालिबान्यांनी तयार केलेल्या दहशतवादाच्या निसरड्या वाटेवर आता स्केटिंगची चाके लीलया फिरू लागली आहेत. विशेष म्हणजे मुलींनी या क्रीडा प्रकाराला चांगलीच पसंती दिली आहे. या पार्कमध्ये मुलींना स्केटिंग शिकण्याची मोकळीक देण्यात आली आहे. आता त्याला धार्मिक कट्टरतावाद्यांकडून पूर्वीसारखा विरोध होताना दिसत नाही. काबूलमधील अनेक कुटुंबांतील मुले मर्यादित उत्पन्न साधनांमुळे मुलींना शाळेत पाठवू शकत नाहीत. परंतु स्केटिस्तानात त्यांची हीसमस्यादेखील दूर झाली आहे.

अफगाणी पोशाख घालतात
अफगाणी पोशाखत स्केटिंग करताना या मुली जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. त्यांना अजूनही मदतीचा हात देण्याची गरज आहे. देशाच्या संस्कृतीचा पारंपरिक पोशाख घालून स्केटिंग करताना मुली त्यांच्या सुरक्षेची काळजी स्वत: घेतात. त्यांच्याकडे हेल्मेट, नी-पॅड व इतरआवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध आहेत.

एनजीओचे प्रयत्न फळाला
स्केटिस्तान ही एक एनजीओ आहे. मुलींना स्केटिंग शिकवतानाच त्यांच्या शिक्षणावरही येथे भर दिला जातो. येथे ४० टक्क्यांपेक्षा जास्त प्रशिक्षक या मुली आहेत. अनेक स्केटबोर्ड मोडले आहेत जुने झाले आहेत. पण मुलींच्या उत्साहात कुठेही त्याची उणीव दिसत नाही. स्केटिंगसोबतच येथे मुलींना शाळेसाठी प्रोत्साहित केले जाते.

छायाचित्र लंडनमध्ये प्रदर्शित
फोटोग्राफर जेसिका फुलफोर्ड - डॉबसन यांनी २०१२ मध्ये स्केटिंग पार्कची छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे लंडनच्या गॅलरीत प्रदर्शित करण्यात आली आहेत. जेसिका फुलफोर्ड - डॉबसन यांनी ९ मुलींची छायाचित्रे क्लिक केली होती. एका मुलीच्या पित्याने सांगितले सुरुवातीला ते स्केटिंगला विरोधात होते. परंतु मुलीच्या जिद्दीपुढे झुकावे लागले.
आता आम्ही हे आनंदाने स्वीकारले आहे.