आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्राचा कारभार अधिक गतिमान, सक्षम करण्यावर भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र : जागतिक आव्हानांचा मुकाबला करताना त्यांचा सोडवणुकीसाठी वैयक्तिक लक्ष घालणार आहे. संयुक्त राष्ट्राचा कारभार लालफितीमधून बाहेर काढून तो सक्षम, गतिमान, कार्यक्षम असला पाहिजे. तो प्रक्रियेत अडकू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नव निर्वाचित सरचिटणीस अँटोनिआे गुटेरेस यांनी दिली आहे. त्यातून आतापर्यंत धिम्या गतीने काम करणाऱ्या संघटनेत व्यापक बदलाचे संकेत मिळाले आहेत.

गुटेरेस यांनी सोमवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. संयुक्त राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष पीटर थाॅमसन यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. त्यासाठी १९३ सदस्यीय जागतिक संघटनेचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.
गुटेरेस आता मावळते सरचिटणीस बान की मून यांची जागा घेतील. मून यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरपर्यंत आहे. १ जानेवारपासून गुटेरेस हे महत्त्वपूर्ण पद सांभाळतील. गेल्या दहा वर्षांपासून मून या पदावर विराजमान होते.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत गुटेरेस यांची निवड झाली होती. या प्रसंगी गुटेरेस पुढे म्हणाले, संयुक्त राष्ट्राने अधिक वेगवान, कार्यक्षम, सक्षमपणे कार्य करण्याची गरज आहे. लोकांंना प्रत्यक्ष काम हवे आहे.
म्हणूनच नोकरशाहीचा कारभार कमी करावा लागणार आहे. प्रक्रिया कमी करून प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यावर भर द्यावा लागेल.

अनेक देशांत हिंसाचार, अस्थैर्य
जगभरातील अनेक देशांत अजूनही हिंसाचार, अस्थिरता दिसत आहे. नागरिकांना ही गोष्ट नाकारली आहे. अनेक सरकारे या पातळीवर अपयशी ठरली आहेत. लोकांमधील असंतोष वाढू लागला आहे.
म्हणूनच नेते आणि लोक यांच्यातील मूल्य वृद्धी करण्याची आता वेळ आली आहे.
जागतिक स्थैर्यासाठी लोकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. आता अशा समस्या सोडवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राचे सदस्य प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नऊ-दहा महिने तैनात करून ठेवावे लागत असल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे मनुष्यबळ वाया जाणार आहे. त्यासाठी संवादाची पद्धती बदलावी लागणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक साधनेही वापरावी लागतील. जेणेकरून संघटनेची सामान्य लोकांपर्यंतची पोहोच खऱ्या अर्थाने व्यापक होईल, असा आशावादही गुटेरेस यांनी व्यक्त केला.

पोर्तुगालचे माजी पंतप्रधान
गुटेरेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अाहेत. १९९५ ते २००२ दरम्यान गुटेरेस पदावर होते. २००५ -२०१५ दरम्यान ते संयुक्त राष्ट्राचे उच्चायुक्त राहिले आहेत. १ जानेवारी रोजी ते पदाची सूत्रे हाती घेतील. ते संघटनेचे नववे सरचिटणीस आहेत.

बातम्या आणखी आहेत...