आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ला सोडून अमेरिकेचा सीरियन सैन्यावरच हल्ला, चार सैनिक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - सिरियात दहशतवाद्यांविरोधात पाश्चिमात्य राष्ट्रांकडून सुरू असलेल्या कारवाईने रविवारी रात्री नवेच वळण घेतले. अमेरिकेच्या नेतृत्वातील संयुक्त लष्कराने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करायचे सोडून थेट सिरियाच्या लष्करी तळांवरच हल्ला चढवला. यात सिरिया लष्कराच्या ४ जवानांचा मृत्यू झाला, तर १३ जखमी झाले.
मागील वर्षभरात प्रथमच संयुक्त सेनेने सिरिया लष्करावर िनशाणा साधला आहे. हा हल्ला देर अल जोर या प्रांतातील साएका लष्करी तळावर केला गेला. वास्तविक, देर अल जोरच्या राजधानीसह बहुतांश भाग इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे. दरम्यान, सिरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कृत्याविरोधात संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद आणि महासभेला पत्र लिहून अमेरिका तसेच यात सहभागी अन्य राष्ट्रांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रातील माहितीनुसार, संयुक्त लष्कराच्या तीन लढाऊ विमानांनी लष्करी छावण्यांवर ९ क्षेपणास्त्रे सोडली. याप्रकरणी सिरियाचे राष्ट्रपती असद यांनी म्हटले की, ब्रिटन दहशतवाद संपवण्याप्रती गंभीर नसून देशातील अधिकृत सरकारला सत्तेवरून खेचणे हा त्यांचा उद्देश आहे. ब्रिटन संयुक्त मोहिमेत सामील होतानाच ही शंका उपस्थित केली होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, रविवारी रशियाने सिरियातील पलमायरा भागातील आयएसच्या ठिकाणांवर हल्ला चढवला.
बचावात्मक धोरण
दहशतवाद्यांच्या विरोधातील सध्याची व्यूहरचना वेगळी आहे. सुरुवातीला आयएसच्या विरोधात केवळ हवाई कारवाई करण्यात आली. आता हवाई कारवाईसह स्थानिक लष्कराच्या मदतीने जमिनीवरूनदेखील कारवाई केली जात आहे. त्यामुळे कारवाईत यश मिळणार आहे. अगोदरच्या युद्धात अमेरिकेचे सैन्य परदेशी भूमीवर अनेक वर्षे राहिले. झुंजले. तेथे अनेकांचे प्राणही गेले. अशी हानी टाळण्यासाठी हवाई कारवाई आणि स्थानिक सैन्याची मदत घेतली जाणार आहे. त्यात
वाढ केली जाईल.
रशियानंतर आक्रमक
अमेरिका इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा खात्मा करेल, अशी आक्रमक घोषणा राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी साेमवारी केली. आयएसचा नायनाट करण्यासाठी युद्धभूमीवर मोठ्या संख्येने लष्करी कुमक पाठवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात रशियानंतर आता अमेरिकेचे आक्रमक हल्ले पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आेबामा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आयएसचा समूळ नायनाट करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
‘दहशतवादी कृती’
कॅलिफोर्नियातील हल्ला दहशतवादी कृती असल्याचे आेबामा यांनी म्हटले आहे. हल्ल्यामागे पाकिस्तानी जोडप्याचा हात असल्याचे धागेदोरे हाती लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.

६५ देशांचा सहभाग
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यूहरचनेत ६५ देशांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यातून आयएसचा नायनाट होणार, असा विश्वास व्यक्त केला जातो.