आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा डावलून अमेरिकेचे चिनी सागरात आव्हान, संरक्षणमंत्र्यांचा दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएसएस रुझवेल्ट (जहाजावरून) - दक्षिण चिनी सागरातील वादग्रस्त क्षेत्रात अमेरिका व चीनदरम्यान निर्माण झालेला तणाव वाढत चालला अाहे. चीन दावा करत असलेल्या सागरी क्षेत्रात अमेरिकेची दोन युद्धनौका दाखल झाल्यानंतर चीनने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत अमेरिकी संरक्षण मंत्री अॅश कार्टर यांनी विमानवाहू रुझवेल्ट या युद्धनौकेचा तातडीने दौरा केला.

चीनने या वादग्रस्त क्षेत्रावर दावा सांगितल्यानंतर अमेरिकेने आपली जहाजे या भागात पाठवून १० सागरी मैल अंतरावर उभी केली आहेत. या माध्यमातून अमेरिकेने एकीकडे चीनचा दावा खोटा ठरवण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे गुरुवारी थेट संरक्षणमंत्र्यांनीच या युद्धनौकेला भेट देत चीनला थेट आव्हान दिले आहे. सामरिकदृष्ट्या चीन दावा करत असलेला हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

कार्टर आशियामधील संरक्षण मंत्र्यांशी या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मलेशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी यूएसएस थिओडोर रुझवेल्ट या युद्धनौकेस भेट दिली. आग्नेय आशिया खंडात शांतता नांदावी व राजकीय स्थिरता राहावी या दृष्टीने निवडक देशांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने अमेरिका दक्षिण चिनी सागरात आपले नौदल कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत कार्टर यांनी या भेटीत दिले.

मलेशियाचे मंत्रीही सोबत
रुझवेल्ट युद्धनौकेच्या दौऱ्यात कार्टर यांच्यासमवेत मलेशियाचे संरक्षण मंत्री हिशामुद्दीन हुसेन हेदेखील होते. या सागरात कृत्रिम बेटे उभी करून आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा चीनचा मानस आहे. मात्र, एकिकडे चीन हळूहळू दक्षिण सागरात पुढ सरकत असताना अमेरिकेने त्याच्या या योजनेस मोठी आडकाठी निर्माण केली आहे. चीनच्या कृत्रिम बेटे उभी करण्याच्या कृतीस मलेशियानेही तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मलेशियाशी सलगी केली असून संरक्षण मंत्र्यांना या देशाच्या दौऱ्यावर पाठवले आहे.आगामी काळात अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांना मलेशियातील सबाह या बंदरामध्ये नियमितपणे प्रवेश मिळावा, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.

टीआर : शक्तिशाली ताफ्यातील नौका
रुझवेल्ट ही लढाऊ युद्धनौका टीआर नावाने ओळखली जाते. अमेरिकी नौदलाच्या ताफ्यात असलेल्या यूएसएस नॉर्मेंडी जहाजासह इतर महाकाय लढाऊ जहाजांच्या रांगेत टीआरलाही प्रचंड महत्त्व आहे. या यादीत यूएसएस चर्चिल, यूएसएस फॅरागट, यूएसएस फॉरेस्ट शेरमन या जहाजांचाही समावेश आहे.

मध्य-पूर्वेत, हिंदी महासागरातही हजेरी
अमेरिकेने आपल्या नौदलाची शक्ती या वर्षी मध्य-पूर्वेत दाखवून दिली होती. याशिवाय हिंदी महासागरात भारत व जपानसोबत अमेरिकेने याच वर्षी संयुक्त कवायती केल्या होत्या. या माध्यमातून चिनी महासागरात आपली हद्द ओलांडून उर्वरित सागरी प्रदेशावर हक्क सांगणाऱ्या चीनवर दबाव आणण्याचाच अमेरिकेचा प्रयत्न होता. यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढत चालला आहे.