आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतीन यांची प्रखर टीका, ओबामांची गोची : अमेरिकेच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- संयुक्त राष्ट्राच्या या वर्षीच्या वार्षिक सभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना संदिग्ध परिस्थितीचा सामना करावा लागला. दशकभरानंतर संयुक्त राष्ट्राच्या सभेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित होते. त्यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे आव्हानच दिले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो, इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी या नेत्यांनी ओबामांची चांगलीच गोची केली.

ओबामांनी आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या धोरणांना रेटून नेण्याचा प्रयत्नही केला. आपल्या धोरणांना यश न आल्याचा दोष त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दिला. या वार्षिक सभेदरम्यान अनेक राष्ट्रांच्या नेत्यांनी ओबामांना खुले आव्हान दिल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. जिनपिंग व रुहानींच्या भाषणांनंतर ओबामांना आपल्या परराष्ट्रनीतीचा सूर बदलणे भाग पडले. आपण रशिया व इराणची मदत घेण्यास तयार आहोत, असे त्यांना म्हणावे लागले. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. रिपब्लिकन पार्टी त्यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत आहे. याबाबतीतही आेबामांनी बचावात्मक भूमिका संयुक्त राष्ट्रासमोर घेतली.

९० मिनिटांच्या चर्चेनंतरही असद नेतृत्वाचा मुद्दा कायम : संयुक्त राष्ट्र सभेदरम्यान पुतीन-ओबामा द्विपक्षीय चर्चा ९० मिनिटे झाली. या उभय चर्चेनंतर पुतीन खुश दिसत होते. जगातील अनेक पेच सोडवण्यासाठी आपण पुतीन यांचे सहकार्य घेण्यास तयार असल्याचे ओबामा म्हणाले. सिरियातील राजकीय बदलांविषयी दोन्ही नेत्यांत सहमती झाली. मात्र असद यांच्या नेतृत्वाचा पेच कायम आहे.

पुतीन यांनी ओबामांना विचारला जाब : संयुक्त राष्ट्रात सोमवारी भाषणांचा दिवस होता. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह सिसी यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान दिले. पूर्व युरोपपासून ते मध्य पूर्वेत तसेच आशियातही अमेरिकेच्या लष्करी नीतीला अयोग्य ठरवण्यात आले. पुतीन यांनी प्रखर टीका केली. इराक व लिबियातील अमेरिकेचा अतिरेकी हस्तक्षेपामुळे जी पोकळी निर्माण झाली त्याला दहशतवादाने भरून काढले. तुम्ही काय करत आहात तुम्हाला तरी कळते का, असा सवाल पुतीन यांनी ओबामांना विचारला.