वॉशिंग्टन - पठाणकोट अतिरेकी हल्ल्याचे पडसाद थेट अमेरिकेच्या संसदेतही उमटले आहेत. अमेरिकी संसदेने ओबामा प्रशासनावर दबाव आणून पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला एफ-१६ लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी संसदेने स्थगिती दिली आहे. सिनेटने या प्रकरणी ओबामा सरकारला स्थगितीची नोटीस बजावली आहे.
पाकमधील "डॉन' वृत्तपत्राने काँग्रेस व राजकीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित केले आहे. वृत्तानुसार, पाकिस्तान या लढाऊ विमानांचा नेमका कशासाठी वापर करेल, याची अमेरिकी खासदारांना चिंता आहे. कारण, अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रास्त्रे पाकने आतापर्यंत भारताविरुद्धच वापरलेली आहेत. या विमानांच्या विक्रीत होत असलेल्या विलंबाबाबत खासदारांनी नोटिसीच्या माध्यमातून स्पष्टीकरणही मागवले आहे. दरम्यान, विक्रीला स्थगिती दिली असली तरी सरकारच्या इच्छेनुसार ती कधीही उठवता येऊ शकते. दरम्यान, पठाणकोट हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याचा अहवाल भारतीय गुप्तचरांकडून देण्यात आलेला आहे.
पाकची वर्तणूक व कर्तृत्वावर शंका : अधिकारी
अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, पठाणकोट हल्ल्याची चौकशी करून दहशतवादी संघटनांवर कारवाई करू, असे पाकने जाहीरपणे सांगितले आहे. मात्र, आतापर्यंतच्या परिस्थितीचा विचार करता पाकची वर्तणूक आणि कर्तृत्वावर शंकाच आहे. पठाणकोटसोबतच अफगाणच्या मजार- ए-शरीफमधील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यातही पाऊल उचलण्याचे पाकने आश्वासन दिले आहे. त्यांनी असे केल्यासच पाकवर विश्वास ठेवता येऊ शकतो, असेही अधिकारी म्हणाले.
संशयितांवर पाकची कारवाई सुरू
सोमवारी पाकिस्तानी माध्यमांत वृत्त आले होते की, पाकच्या गुप्तचर संस्थांनी काही संशयितांना बहावलपूर जिल्ह्यातून उचलले आहे. बहावलपूर हे प्रतिबंधित अतिरेकी संघटना जैश-ए-माेहंमदचा म्होरक्या मौलाना अजहर मसूदचे मूळ गाव आहे.
पाकला वेळ द्यायला हवा : राजनाथ सिंह
नोएडा | पठाणकोट हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानाला सोपवल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी म्हणाले , पाकिस्तानाला तपासासाठी आणखी काही वेळ दिला जायला हवा. इतक्या लवकर अविश्वास दाखवण्याचे कोणतेही कारण नाही. पाकिस्तानने सांगितलेले आहे, ते प्रभावी कारवाई करतील. मला वाटते की आपण काही वेळ वाट पाहिली पाहिजे. राजनाथ म्हणाले, पाकने भारताला अाश्वासन दिलेले असल्यामुळे इतक्या लवकर त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचे कोणतेही कारण नाही.
पाकच्या अाश्वासनाने अमेरिका समाधानी
वॉशिंग्टन | पठाणकोट हल्ल्याचा निषेध व्यक्त करून त्याप्रकरणी चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या आश्वासनावर अमेरिकेने समाधान व्यक्त केले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले, तपासात पारदर्शकता बाळगली जावी. तसेच तो वेगाने पूर्ण करण्यात यावा. दोन्ही देशांनी शांतता चर्चा सुरू ठेवण्याची व्यक्त केलेली इच्छा स्वागतार्ह अाहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात चर्चा झाली.