आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकला हिमवादळाचा तडाखा; जनजीवन ठप्प, 10 राज्यांत प्रचंड बर्फवृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. उत्तर कॅरोलिना, टेनिसी, व्हर्जिनिया, फिलाडेल्फिया, मेरिलँड, न्यूजर्सी, न्यूयॉर्क यासह १० राज्यांना त्याचा फटका बसला अाहे. त्यामुळे वीज व्यवस्थेसह पायाभूत सुविधा कोलमडली. १ लाख २० हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना काळोखात रात्र काढावी लागली. विविध दुर्घटनांत १० जणांचा मृत्यू झाला.

हिमवादळाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज व्यवस्था कोलमडली आहे. शुक्रवारपासूनच वादळाचा फटका बसला. सहा राज्यांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात वॉशिंग्टन डीसीचादेखील समावेश आहे. वादळ आणि तुफानी बर्फवृष्टी राहिल्यास आगामी काही तासांत ३० इंचापर्यंत बर्फ पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागात अशी बर्फवृष्टी झाल्याचे सांगण्यात येते. बर्फवृष्टीमुळे व्हर्जिनियात अनेक दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. गेल्या चोवीस तासांत सुमारे ८०० घटनांना व्हर्जिनियातील पोलिसांना हाताळावे लागले आहे.
ओबामा अडकले
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा राजधानीतील बर्फवृष्टीमुळे व्हाइट हाऊसमधून बाहेर पडू शकले नाहीत. त्याशिवाय नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे, असा आग्रह प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे दहा राज्यांतील शाळांना तूर्त सुटी जाहीर झाली आहे.
विमान फेऱ्या रद्द
गेल्या काही तासांत बर्फवृष्टीमुळे हजारो विमान फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सुमारे ७ हजार ६०० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याशिवाय सार्वजनिक वाहतूक प्रणालीदेखील ठप्प झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घ्यावा लागला आहे. रस्त्यावर बर्फाचा थर साचला आहे.
तेलुगू असोसिएशनचे आवाहन
व्हर्जिनियाला वादळाचा फटका बसला आहे. या प्रांतात तेलुगू भाषिक नागरिक मोठ्या संख्येने राहतात. प्रदेशात गुरुद्वारा, मंदिरांची संख्याही अधिक आहे. वादळामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन तेलुगू असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. बेघर झालेल्यांसाठी या भागातील नागरिकांनी आपली घरे खुली केली आहेत.
९० वर्षांतील मोठी घटना : अमेरिकेने ९० वर्षांत कधीही पाहिले नव्हते असे हिमवादळ यंदा अनुभवले. प्रचंड बर्फवृष्टी आणि वादळी वारे यांच्यामुळे अनेक प्रदेशांत धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, असे नॅशनल वेदर सर्व्हिसेसच्या वतीने सांगण्यात आले.