आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिसा वाद: अमेरिकाविरोधी आंदोलनात हैदरींना घडला होता कारावास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - सिनेटचे उपसभापती अब्दुल गफूर हैदरी यांना अमेरिकेने निर्धारित वेळेत व्हिसा न दिल्याने पाकिस्ताने चांगलाच भडकला आहे. पाकिस्तानचे प्रतिनिधी मंडळ आंतरसंसदीय संघाच्या (आयपीयू) बैठकीवर बहिष्कार टाकेल, अशी घोषणा सिनेटचे सभापती रझा रब्बानी यांनी केली आहे. ही बैठक १३ आणि १४ फेब्रुवारीला अमेरिकेत होत आहे. अमेरिकेने हैदरी यांना व्हिसा दिलाही नाही आणि तो देण्यास मनाईही केली नाही. तांत्रिक पद्धतीने तो रोखला आहे.

अमेरिकेने हैदरी यांचा व्हिसा खासगी पद्धतीने रोखला आहे. हैदरी यांनी वैयक्तिकरीत्या व्हिसा मागितला नव्हता, सिनेटच्या सचिवालयाने त्यासाठी अर्ज केला होता. अमेरिकेच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे हैदरी २००१ मध्ये पाच महिने तुरुंगात होते. अफगाणिस्तानवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानने अमेरिकेला मदत करण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. हैदरी आणि त्यांच्या पक्षाचा इस्लामच्या देवबंदी स्कूलशी संबंध आहे.

अमेरिकेने पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळातील दुसरे सदस्य सिनेटर सलाहुद्दीन तिरमिजी यांना व्हिसा दिला आहे. लेफ्टनंट जनरल सलाहुद्दीन माजी लष्करी अधिकारी आहेत. हैदरी हे उजव्या धार्मिक विचारसरणीच्या संघटनेशी संबंधित जमात उलेमा इस्लाम पक्षाच्या फज्ल गटाचे (जेयूआय-एफ) नेते आहेत. ते बलुचिस्तानच्या कलातमधून पाकिस्तानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य होते. २००८ पासून ते सिनेटर आहेत.
 
पाकिस्तान किंवा हैदरींवर बंदी नाही 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांच्या लोकांवर बंदी घातली होती. या देशांत पाकिस्तानचे नाव नाही. अनेक देशांच्या लोकांवरही अमेरिकेने बंदी घातली आहे, पण त्यातही हैदरींचे नाव नाही.
 
ट्रम्प पाकिस्तान विरोधी नाही 
भारतात ट्रम्प यांना भारत समर्थक मानले जाते, पण ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत काम करण्याचे आश्वासन दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजीज हे दोन दिवसांआधीच अमेरिकेहून परतले आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नवाझ शरीफ लवकरच ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. अमेरिका पाकिस्तानवर प्रवास बंदी घालू शकतो, हे वृत्त अमेरिकेने फेटाळून लावले आहे.

मलाही व्हिसा नाही : एक सिनेटर
अमेरिकेने आपल्याला व्हिसा देण्यास मनाई केली आहे, असा दावा पाकिस्तानचे आणखी एक सिनेटर हाफिज हमदुल्लाह यांनी केला आहे. हमदुल्ला हेही जेयूआय-एफ या इस्लामी पार्टीचे आहेत. हमदुल्ला म्हणाले की, मी चार तास रांगेत उभा होतो, पण त्यांनी व्हिसा देण्यास नकार दिला. ही घटना ८ नोव्हेंबरला ट्रम्प हे अध्यक्षपदी निवडून येण्याआधीची आहे.
 
उत्तर देण्यास नकार
पाकिस्तानी सिनेट सचिवालयाचे प्रवक्ता नूर अहमद कक्कर आणि अमेरिकेच्या दूतावासाचे प्रवक्ता फ्लोर कोवान यांनी हैदरींच्या व्हिसाबाबत कुठलीही टिप्पणी करण्यास इन्कार केला. कोवान म्हणाले की, कोणत्याही एका व्यक्तीला व्हिसा देणे किंवा न देणे यावर मी टिप्पणी करू शकत नाही.
 
अमेरिकनांचे स्वागत न करण्याचा निर्णय
पाकिस्तानी सिनेटने सोमवारी एक वक्तव्य जारी करून म्हटले आहे की, आता पाकिस्तानचे प्रतिनिधी मंडळ आयपीयूच्या बैठकीत सहभागी होणार नाही. त्याचबरोबर या प्रकरणावर तोडगा निघेपर्यंत संसद, संसदीय समित्या, संसद सदस्य, अमेरिकेचे शिष्टमंडळ, संसद सदस्य किंवा राजनयिकांचे स्वागत करणार नाही.
बातम्या आणखी आहेत...