आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या युद्धनौका उत्तर कोरियाकडे रवाना! क्षेपणास्त्र चाचण्यावरून कचाट्यात पकडणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- सिरियावर क्षेपणास्त्र हल्ला चढवल्यानंतर आता अमेरिकेने त्यांचा मोर्चा उत्तर कोरियाकडे वळवला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्याकडून घातक क्षेपणास्त्रांची वारंवार होत असलेली चाचणी लक्षात घेता अमेरिकेने आता त्यांना कचाट्यात पकडण्याची याेजना आखली आहे.
 
बुधवारी उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचाही मारा केला होता. विशेष म्हणजे जपानच्या याच भागात अमेरिका आणि चीन यांच्या द्विपक्षीय शिखरवार्ता सुरू आहे. शिवाय, सिरियावर अमेरिकेने हल्ला सुरू केल्यामुळे उत्तर कोरियाने अाण्विक शस्त्रास्त्र वापरण्याची धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांचे क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले लढाऊ जहाज प्रशांत महासागरात उत्तर कोरियाच्या दिशेने रवाना केले आहेत. 

अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडचे कमांडर डेव्ह बेन्हम यांच्या मते, अमेरिकेच्या नौदलाने त्यांची ‘कार्ल विन्सन’ ही लढाऊ आरमारांची तुकडी पश्चिम प्रशांत महासागरात तैनात करण्यासाठी पाठवून दिली आहे. या तुकडीत लढाऊ जहाजांसोबतच क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या लढाऊ विमानांचाही समावेश आहे. पश्चिम प्रशांत महासागरासाठी उत्तर कोरिया हा भयंकर मोठा धोका आहे. त्यांच्याकडून या भागात वारंवार क्षेपणास्त्र आणि अणुचाचण्यांचे परीक्षण केले जात आहे. त्यामुळे, या भागात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित न होऊ देणे हा जगासमोरील मोठा प्रश्न आहे. त्यासाठीच आम्ही नौदलाची ही तुकडी त्या भागात पाठवत आहोत. तज्ज्ञांच्या मते, ही तुकडी आधी ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार होती. परंतु, उत्तर कोरियाने अचानक आव्हान दिल्यामुळे ती सिंगापूरहून प्रशांत महासागराकडे रवाना झाली. 

यूएसएस कार्ल विन्सन
कोरियाच्या सागरी भागात पाठवण्यात आलेल्या ‘कार्ल विन्सन’ आरमार तुकडीचे नेतृत्व अॅडमिरल नोरा टायसन करत आहेत. यात दोन क्षेपणास्त्ररोधक आणि एक गायडेड मिसाइल क्रुझरही आहे.
 
सिरियावरील आक्रमणाबाबत अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेतील प्रतिनिधी निक्की हॅले म्हणाल्या, सिरियात सत्ताबदल करणे हे सध्या अमेरिकेचे पहिले प्राधान्य आहे. रशियाकडून सिरियात सुरू असलेला हस्तक्षेप चुकीचा असून रशियाच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेसोबतच्या संबंधांवर पुनर्विचार करायला हवा.

उ.कोरियाकडून खोडसाळपणा सुरूच
जपानमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यात शिखरवार्ता सुरू असतानाच उत्तर कोरियाने बुधवारी जपानच्या समुद्रात मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा केला होता. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही त्यांनी पश्चिमी तटावर चार क्षेपणास्त्रे सोडली होती. याच भागामध्ये अमेरिकेने नौदल तळ तयार केलेले आहे.

सिरिया हल्लाप्रकरणी जागतिक प्रतिक्रिया
इराण :
आम्ही दहशतवादाविरोधातील संघर्षात नेहमीच सिरियासोबत आहोत. त्यांच्या अखंडतेचे रक्षण करू.
- राष्ट्रपती हसन रुहानी

सिरिया : अमेरिकेने हल्ला करून त्यांचे लक्ष्य मिळवले नाही. त्यामुळे उलट दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सिरियातील जनता आणि लष्कर कटिबद्ध आहे. 
- बशर अल-असद, राष्ट्रपती

तुर्की: सिरियात युद्धविराम व्हायला हवा. मात्र, रशियाने असद यांना राष्ट्रपतिपदी कायम ठेवण्याची जिद्द बाळगू नये.
- मेवलत कावूसोग्लू, परराष्ट्रमंत्री

ब्रिटन: रशियाकडून अद्यापही असद यांना राष्ट्रपतीच्या रूपातच मदत सुरू आहे. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यातील माझा रशिया दौरा रद्द करत आहे.
- बोरिस जॉन्सन, परराष्ट्रमंत्री

अमेरिका : सिरियाच्या राष्ट्रपतींवर आम्ही दबाव ठेवूच. आम्ही रशियावर हल्ला केला नसल्यामुळे त्यांच्याकडून प्रत्युत्तराच्या कारवाईचा अंदाज नाही.
- रेक्स टिलरसन, परराष्ट्रमंत्री
बातम्या आणखी आहेत...