आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालामुखीचा उद्रेक; अन्सारींच्या ब्रुनेई भेटीला विलंब, आज होणार रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपतींंच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. - Divya Marathi
महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपतींंच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
बाली - इंडोनेशियातील यशस्वी दौरा आटोपल्यानंतर बुधवारी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना ब्रुनेई दौरा एक दिवस लांबणीवर टाकावा लागला. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर धूळ-राखेचे वादळ निर्माण झाल्याने येथील विमानतळ एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले. म्हणून उपराष्ट्रपती आता गुरुवारी ब्रुनेईला रवाना होतील.

बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास अन्सारी यांचे विशेष विमान बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ब्रुनेईकडे रवाना होणार होते; परंतु बरुजारी पर्वतावरील ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यानंतरही काही वेळातच परिसरात सर्वत्र राख आणि धूळ पसरली. बालीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ याच परिसरात आहे. राख आणि धुळीच्या वादळामुळे गुरुवारी सकाळी पावणेनऊपर्यंतची विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे विमान व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे विमानतळावर अनेक विमाने उभी असल्याची दिसून आली. दरम्यान, परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर अन्सारी यांच्या विमानाला उड्डाणाची परवानगी दिली जाईल. दरम्यान, ब्रुनेई दौरा द्विपक्षीय पातळीवर महत्त्वाचा असून कच्च्या तेलाचा भारत मोठा आयातदार देश आहे. त्यादृष्टीने अन्सारी यांच्या भेटीकडे लक्ष लागले आहे.

पहिलेच उपराष्ट्रपती
अन्सारी ब्रुनेईला भेट देणारे पहिलेच भारतीय उपराष्ट्रपती ठरणार आहेत. ब्रुनेईचे राजे हसनल बोलकिया आणि हाजी अल-मुहताद्दी बिलाह यांची भेट घेणार आहेत.

२ दिवस जकार्तामध्ये
उपराष्ट्रपती अन्सारी १ नोव्हेंबर रोजी इंडोनेशियात दाखल झाले होते. जकार्तामध्ये ते दोन दिवस मुक्कामी होती. मंगळवारी ते ब्रुनेईला रवाना होण्यासाठी बालीत दाखल झाले होते.

धगधगता ज्वालामुखी
रिनजानी पर्वतावरून धुळीचे मोठमोठे लोट खाली वाहत येत आहेत. उद्रेकानंतर सुमारे चार तास नगुराह राय आंतरराष्ट्रीय विमानतळ चार तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या व्हर्जिन आणि जेटस्टार या कंपन्यांनी आपल्या सेवा अगोदरच बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.

प्रवासी ताटकळले
सध्या इंडोनेशियात सुट्यांचा मोसम आहे. त्यातच बालीमध्ये जगभरातील अनेक पर्यटकांची गर्दी झाली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर हजारो पर्यटकांचा खोळंबा झाला असून बालीतच त्यांना मुक्काम ठोकावा लागला आहे.

तानाह लॉट टेम्पलला भेट
अन्सारी यांनी बुधवारी बालीतील प्रसिद्ध तानाह लॉट मंदिराला भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी उडायाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधला.

इंडोनेशियाच्या उद्योजकांना आवतण
इंडोनेशियातील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन अन्सारी यांनी केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोळसा, तेल, रबर इत्यादी क्षेत्रांत गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचे अन्सारी यांनी उद्योजकांना ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून गतवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भारत-इंडोनेशियात अनेक क्षेत्रांत करार झाले.