आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धापेक्षा कूटनीती बरी, हेच इराण करारामागील तत्त्व - ओबामांची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातील सहा महाशक्तींनी मंगळवारी इराणशी केलेल्या आण्विक करारावर टीका होत असतानाच राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आमच्यासमोर दोन पर्याय होते. एकतर युद्ध किंवा कूटनीती. त्यापैकी कूटनीतीच्या मार्गाने इराणशी समेट घडवण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रादेशिक पातळीवर शांतता राखण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. इराणसोबत करार झाला नसता तर मध्यपूर्वेत युद्धाची अधिक शक्यता होती. हा धोका लक्षात घेऊन मित्रराष्ट्रांनी इराणसोबत करार करण्यावर सहमती झाली. आण्विक स्पर्धेला चिथावणी देणाऱ्या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे. मध्य-पूर्वेतून आण्विक शस्त्रहल्ल्याचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट होते, असे आेबामा म्हणाले. गुरुवारी ते व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. खरे तर हा प्रश्न हुशारीने घेतला नसता तर पुढील पिढीने कदाचित आपल्याला क्षमा केली नसती. दुसरीकडे इस्रायलसह अनेक देशांच्या नेत्यांनी इराणसोबतच्या करारावर टीका केली. अशा प्रकारे करार करण्याचा पर्याय निवडणे चुकीचे होते, अशी प्रतिक्रिया अनेक देशांनी दिली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

इराणकडील आण्विक हत्यारे नष्ट करण्यासाठी केवळ दोन पर्याय होते. त्यामुळे एक निर्णय घेण्यात आला. परंतु आता ९९ टक्के लाेक आणि तज्ज्ञांना हा निर्णय योग्य वाटतो. कारण त्यामुळे इराणला अणुबॉम्ब बाळगण्यापासून रोखता येऊ शकेल, असे त्यांना वाटते.

...तर संघर्ष उदभवेल
इराणसोबत आण्विक करार झाला नसता तर आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांच्या अणू कार्यक्रमाची जवळून निगराणी करणे शक्य झाले नसते. आता तज्ज्ञांकडून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. परंतु इराणने करारातील अटींचे उल्लंघन केल्यास मात्र खऱ्या संघर्षाला सुरुवात होईल. आता निर्बंधातून बाहेर पडून इराणची अर्थव्यवस्था सुधारेल, परंतु नियम मोडल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, असा इशाराही आेबामा यांनी एका प्रश्नावर बोलताना दिला.

अमेरिकेचा निर्बंध कायमच
इराणसोबत करार केला म्हणून त्यांच्याशी असलेले मतभेद मिटलेले नाहीत. इराण दहशतवादास पाठिंबा देतो. मानवी हक्कांची पायमल्ली करतो. क्षेपणास्त्रांची निर्मिती करतो. या मुद्द्यांवर मात्र अमेरिकेचे इराणवरील निर्बंध कायम राहणार आहेत. दुसरीकडे इस्रायलला सहकार्य सुरूच राहणार आहे. त्याशिवाय आखाती देशांनाही अमेरिकेची मदत सुरू राहील, असे आेबामा यांनी स्पष्ट केले आहे.

जगाच्या सुरक्षेसाठी
इराणसोबतचा हा करार जगाच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे जग अधिक सुरक्षित होईल. इराणच्या आण्विक कार्यक्रमाला कोणतेही बंधन नसेल. कोणत्याही प्रकारची निगराणी नसेल तर धोका होता. परंतु आता पर्याय म्हणून या कराराची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे इराणकडे यापुढे कधीही आण्विक अस्त्र दिसून येणार नाही. याच गोष्टीला माझ्या पातळीवर सर्वाधिक प्राधान्य होते, असे आेबामा यांनी सांगितले.

अणुकरार हा इराणचा विजय : रुहानी
तेहरान - सहा महाशक्तींसोबत झालेला आण्विक करारावरून अमेरिकेत वादंग माजलेले असतानाच इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी मात्र वेगळा सूर लावला. आता जग इराणला जगासाठी धोकादायक मानत नाही. आण्विक ऊर्जेच्या पेचातून बाहेर पडून विकास करू शकेल. आता आम्ही नवीन विमाने खरेदी करू शकतो. कारण विमान आणि सुट्या भागांच्या खरेदीवरील बंधन हटवण्यात येईल. हा करार इराणसाठी कायदेशीर, तांत्रिक आणि राजकीय पातळीवरील मोठा विजय आहे, असे रूहानी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे करारामुळे मिळणारा ६ हजार ३५१ अब्ज रूपयांचा निधी कसा खर्च केला जाणार यावरून इराणमध्ये वाद सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...