आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएस होणार नेस्तनाबूत, कारवाईसाठी एकवटले जग, हल्ले सुरू, 36 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाची लढाऊ विमाने सिरियातील आयएसच्या अड्ड्यांवर बाॅम्बवर्षाव करताना
संयुक्तराष्ट्रे- इस्लामिक स्टेटला नेस्तनाबूत करण्यासाठी फ्रान्सकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने एकमुखाने मंजुरी दिली. त्यामुळे आता सदस्य राष्ट्रांच्या मदतीने अतिरेक्यांना प्रतिबंध करण्यासाठी हल्ले चढवण्यात येणार असल्याने आयएस नेस्तनाबूत करण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे मानले जाते.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा जागतिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन हल्ले चढवण्याची रणनीती आखण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांचे सहकार्य घेतले जाईल. त्यातून हा धोका परतवून लावला जाईल, असा विश्वास सुरक्षा परिषदेत फ्रान्सकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावात व्यक्त करण्यात आला आहे. हा ठराव शुक्रवारी स्वीकारण्यात आला. १९९९ पासून सुरक्षा परिषदेच्या कामाला सुरुवात झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वात सक्रिय संस्थेपैकी असलेल्या सुरक्षा परिषदेच्या ठरावामुळे आयएससह जगभरातील सर्व दहशतवादी संघटनांच्या विरोधात महायुद्धाचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या आठवड्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटनेने हा ठराव मंजूर केला आहे. त्या हल्ल्यात १३० जण ठार झाले होते. हा हल्ला आयएसने केला होता.

मलेशियाचा संताप - ‘दहशतवादी-राक्षस’
मुस्लिम बहुल मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी इस्लामिक स्टेट ही संघटना म्हणजे राक्षसी प्रवृत्तीची संघटना असून त्यांचा खात्मा करण्याच्या लढाईत आम्ही सहभागी होण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. हा अत्यंत विध्वंसक विचार आहे. त्याला नष्ट केले पाहिजे. वास्तवात जगाला आधुनिकतेची गरज आहे. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग यांनी लोकांची मने किंबहुना शत्रूंचेदेखील हृदय परिवर्तनाचे प्रयत्न केले होते. ही आपली परंपरा आहे, असे रझाक म्हणाले.

इराक,सिरियातील सेफ हेवन नष्ट करणार
संयुक्त राष्ट्राच्या ठरावात इराक आणि सिरियातील इस्लामिक स्टेटच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्याचा मुद्दा आहे. इराक आणि सिरियातील काही प्रदेश आयएससाठी ‘नंदनवन’ बनले आहेत. त्यांना लक्ष्य केले जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आयएसने सिरियात दहशतवादी प्रशिक्षण अड्डे सुरू केले. त्यामुळे प्रदेशात अतिरेकी कारवायांत वाढ झाली आहे.

युरोपियन संघटनेकडून सरहद्दींवर सुरक्षा
पॅरिस हल्ल्याच्या आठवड्यानंतर सुरक्षा परिषदेने सर्व सदस्यांना आयएसच्या विरोधात संघर्षाचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर युरोपियन संघटनेने आपल्या सदस्य राष्ट्रांच्या सरहद्दींवर सुरक्षा वाढवली आहे. ब्रुसेल्सने दहशतवादाचा अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. बेल्जियममध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने युरोपियन संघटनेने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

रशिया आणि सिरियन फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३६ जण ठार झाले. सिरियाच्या पूर्वेकडील डैर एझार प्रांतात बाॅम्बहल्ले करण्यात आले. घटनेत अनेक जखमी झाले. अमेरिकेच्या सहकारी देशांनी सोमवारी आयएसच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यात किमान ११६ इंधन ट्रक नष्ट करण्यात आले. रशियाने युद्धनौकेवरून किमान १८ क्षेपणास्त्रांचा हल्ला आयएसच्या अड्ड्यांवर केला.