रबात - मोरोक्को या इस्लामी देशाचे सरकार महिलांच्या अजब मागणीमुळे सध्या द्विधावस्थेत आहे. विशेष म्हणजे या मागणीमुळे महिला अधिकारांचे समर्थन करणाऱ्या संघटनांतही फूट पडली आहे. मागणीही तशीच आहे!
सोशल मीडियावर मागील महिन्यापासून ‘वुमन ओन्ली बीच : नो मेन अलाऊड’ नावाचे अभियान सुरू आहे. महिलांसाठी सागरी किनारे आरक्षित करून पुरुषांना प्रवेशबंदी करावी, अशी तांगगियर शहरातून सुरू झालेल्या या अभियानाची मागणी आहे. ‘उकाड्याचे दिवस सुरू होणार असून, आम्हालाही पुरुषांप्रमाणे पोहण्याचा आनंद लुटायचा आहे. बुरखा घालून पोहणे शक्य नाही व परपुरुषांसमोर बुरखा काढणे परंपरेविरुद्ध आहे. बुरखा काढून पोहण्याची
इच्छा असली, तरी छेडछाडीची शक्यता असते. म्हणून आता महिलांसाठी आरक्षित किनारे ठेवावेत. या किनाऱ्यांवर पुरुषांच्या प्रवेशास बंदी घालावी. असे केल्यास परंपरा न तोडता महिला पोहण्याचा आनंद घेऊ शकतील. हा आमचा अधिकार आहे’, अशी मागणी महिला संघटनेने केली आहे.
या अभियानात दहा हजार महिला सहभागी आहेत. मात्र, मोरोक्को सरकारव्यतिरिक्त इतर संघटनांनीही या मागणीला विरोध केला आहे. ‘आम्ही महिलांना आवश्यक असलेले सर्वच अधिकार दिले आहेत. उघड्यावर पोहण्यासाठी वेगळे सागरी किनारे आरक्षित करणे मूर्खपणाचे ठरेल. महिलांनी विदेशी लोकांचे अनुकरण करू नये’, असे विरोध करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे.