बोगोटा - कर्तव्यापलीकडे जाऊन एका अनाथ मुलीला आपले दूध पाजून तिला वाचवणाऱ्या कोलंबियातील एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर सध्या जगातून स्तुतिवर्षाव होत आहे.
५९ वर्षीय एडिनोरा संत्रे तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना रडण्याचा आवाज ऐकू आला. जवळ जाऊन पाहिले असता झुडपात एक नवजात मुलगी जोरजोरात रडत असल्याचे त्यांना दिसले. हे स्थळ शहरापासून बरेच दूर आहे. तेथे सामान्यत: फार कमी वर्दळ असते. एडिनोरा यांनी पोलिसांना माहिती दिली.
स्थानिक पोलिस प्रमुख झेव्हियर मार्टिन यांनी सांगितले, ‘मुलीचा जन्म काही तासांपूर्वीच झाला होता. नाळही तशीच होती. कुठल्यातरी प्राण्याने तिला इजा करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे शारीरिक तापमान कमी होण्याचा धोका होता. मुलीवर लवकर उपचार सुरू व्हावेत म्हणून तिला घेऊन जावे, असे कोलंबियन फॅमिली इन्स्टिट्यूटला कळवले.
पण शहरातून रुग्णवाहिका येण्यास वेळ लागतो. मुलगी भुकेली होती. तिला दुधाची गरज होती. त्यामुळे आम्ही लुइसा फर्नेंडा यांना बोलावले. त्यांना काही दिवसांपूर्वीच अपत्यप्राप्ती झाली होती. माहिती मिळताच त्या आल्या आणि रुग्णवाहिका येईपर्यंत अनेक वेळा त्यांनी या मुलीला आपले दूध पाजले.’
डॉक्टरांच्या मते, लुइसा यांनी आईचे कर्तव्य बजावल्यामुळेच मुलीचे प्राण वाचले अन्यथा भुकेमुळे तिचा मृत्यू होण्याची शक्यता होती. लुइसा म्हणाल्या, ‘मीही आताच आई झाले आहे. त्या मुलीला दुधाची गरज होती. कुठल्याही आईने जे केले असते तेच मी केले. अशा स्थितीत कुठल्याही महिलेने असेच करायला हवे. मुलीचा दोष काय?’
आता मुलगी पूर्णपणे सुरक्षित आहे. तिची प्रकृती सुधारत आहे. मुलीला टाकून देणाऱ्या महिलेचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच मुलीला दत्तक घेऊ शकेल,अशा कुटुंबीयांचाही शोध सुरू आहे.