आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाहोरच्या महिलांचे भेदभाव, शोषणाविरोधात "वुमन ऑन व्हील्स कॅम्पेन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - लाहोरच्या वर्दळीच्या रस्त्यावर तब्बल दीडशे मोटारसायकली सलग येऊन थांबल्या. मात्र, जीन्स आणि चकाकते जॅकेट घातलेल्या चालकांनी डोक्यावरून पांढऱ्या रंगाचे हेल्मेट हटवताच बघ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या सर्व महिला होत्या. "वुमन ऑन व्हील्स' अभियानाअंतर्गत प्रशिक्षणानंतर अायोजित रॅलीत त्या सहभागी झाल्या.

रॅलीत सहभागी झालेल्या २२ वर्षीय तय्यबा तारिकसह या सर्व महिला पुरुषांनी घातलेल्या मर्यादांना आव्हान देत आहेत. तय्यबाच्या मते, धावपळ करून बस पकडणे, त्यातही धक्के व गैरवर्तनाचा सामना करणे नित्याचेच झाले आहे. कॅब किंवा रिक्षाचालकही पुरुषच असतात. लैंगिक भेदभाव तर विचारायलाच नको. या सर्व समस्यांतूनच या अभियानाचा जन्म झाला. रस्ते आणि खाद्यपदार्थांच्या दुकानात महिलांनी आता स्थान मिळवले असून मोटारसायकल चालवणे शिकल्यास त्या स्वतंत्रपणे फिरूही शकतील. तय्यबा रोज २५ किमी मोटारसायकल चालवण्यासोबतच कस्टम अधिकाऱ्याचे कर्तव्यही निर्विवाद पार पाडत आहे. वाहतूक पोलिस सज्जाद मेहदी यांच्या मते, या महिलांना आपण प्रशिक्षण दिले. मात्र, त्यापैकी कित्येकींनी तर स्वत:च मोटारसायकल चालवणे शिकून घेतले. महिलांसोबतचे भेदभाव लक्षात घेऊन नाेव्हेंबरमध्ये त्यांनी "वुमन ऑन व्हील्स' अभियान सुरू केले. याचा पहिला टप्पा रविवारी पार पडला. विद्यार्थिनी आणि श्रमिक महिलांना स्वस्त दरात १ हजार गुलाबी मोटारसायकल/स्कूटर देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.

हीच गोष्ट लक्षात घेऊन असलम जार यांनी गुलाबी रिक्षा सुरू करत महिलांकडून महिलांना प्रशिक्षण दिले. तय्यबा आणि असलम पाकमधील परिवर्तनाचे उत्तम उदाहरण ठरत आहेत. तय्यबा म्हणते, आम्ही मोटारसायकल कशी चालवतो हे पाहण्यासाठी मुले आमच्या मागे लागले असतात. त्यांनी आम्हाला कमकुवत समजू नये. कारण, आम्ही कदापि घाबरत नाही.