आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी गटांविरुद्ध एकट्यानेच कारवाई करू; अमेरिकेने दिला पाकिस्तानला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी गटांच्या विरोधात आयएसआयने कारवाई केलेली नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तेव्हा आम्हीच एकट्याने या गटांविरुद्ध कारवाई करू, असा कडक इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.

वॉशिंग्टनमधील पॉल एच. नित्झे स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अमेरिकेचे कार्यकारी उपसचिव अॅडम झुबिन म्हणाले की, पाकिस्तानच्या सरकारमध्ये विशेषत: आयएसआयमधील काही गट त्या देशात कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांच्या विरोधात पावले उचलण्यास विरोध करत आहेत. तुमच्या देशात कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी नेटवर्कच्या विरोधात कारवाई करा, असे आवाहन आम्ही पाकिस्तानला करत आहोत. त्यांना मदत करण्याची आमची तयारी आहे. मात्र, पाकिस्तानने या दहशतवादी गटांवर कारवाई केली नाही तर आवश्यकता भासेल तेव्हा आम्ही एकट्यानेच कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही.

झुबिन म्हणाले की, पाकिस्तानही दहशतवादाचा बळी ठरला आहे. शाळा, बाजारपेठ आणि मशिदींवरही निर्घृण दहशतवादी हल्ले झाले आहेत. दुर्दैवाने ही यादी वाढतच चालली आहे. त्यामुळे पाकिस्तान मागे ढकलला जात आहे. वायव्य पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या सुरक्षित अड्ड्यांवर कारवाई करण्यात पाकिस्तानला यश मिळाले आहे हे खरे आहे.

आयएसआयएला दहशतवादी संघटना म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानविरोधातही कारवाई झाली आहे, पण दहशतवादी गटांना आयएसआयचा पाठिंबा ही मोठीच समस्या आहे. दहशतवादी गटांना आश्रय दिला जात असल्याचा आरोप पाकिस्तानने सातत्याने फेटाळून लावला आहे. दहशतवादविरोधातील लष्करी कारवाईमुळे देशातील दहशतवाद्यांची पाळेमुळे उद्ध्वस्त होत असल्याचा दावाही पाकिस्तान करत आला आहे.

अमेरिकेचे लक्ष्य : हक्कानी नेटवर्क
हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करत आहे. पाकिस्तान त्यांच्याविरोधात पुरेशी कारवाई करत नाही, अशी भूमिका अमेरिकेने सातत्याने घेतली आहे. तालिबानच्या हातात हात घालून काम करणारा हक्कानी गट पाकिस्तानी भूमीवरून काबूलमध्ये हल्ले घडवत आहे, त्यांना आयएसआयची मदत मिळत आहे, असा आरोप अफगाणिस्तान प्रशासन करत आहे. ‘हक्कानी गट अफगाणिस्तानमध्ये हल्ले करण्यात यशस्वी ठरला आहे. या गटामुळे अमेरिकींना आघाडीतील सदस्य देशांच्या नागरिकांना तसेच अफगाणी नागरिकांनाही धोका आहे,’ असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...