आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Become Nuclear Weapons Free, G 7 Nations Appeal

जग अण्वस्त्रमुक्त व्हावे; जी-७ राष्ट्रांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरोशिमा - जी-७ देशांनी रविवारी अण्वस्त्रमुक्त जगाच्या निर्मितीचे आवाहन केले. जपानमधील ऐतिहासिक हिरोशिमा शहरात या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची संयुक्त बैठक पार पडली. परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर हिरोशिमा जाहीरनामा जारी केला गेला. यात अण्वस्त्रमुक्त जगाचे आवाहन करण्यात आले. "आम्ही सुरक्षित व अण्वस्त्रमुक्त जग बनवण्याप्रती कटिबद्ध आहोत. आम्हाला आंतरराष्ट्रीय स्थैर्य टिकवून ठेवायचे आहे. असे असले तरी सिरिया, युक्रेन आणि उत्तर कोरियासारख्या देशांमधील बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे ते जटिल झाले आहे,' असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

हिरोशिमात १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धावेळी पहिल्यांदा अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते. त्यात त्या वेळी ४० हजार नागरिक मारले गेले होते. या हल्ल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी स्मारक आणि शांती संग्रहालयाचा दौरा केला. अणुबॉम्ब हल्ल्यानंतर या ठिकाणी येऊन मृतांना श्रद्धांजली वाहणारे ते पहिले अमेरिकी नेता ठरले आहेत. या वेळी केरी म्हणाले, हे स्मारक अद्भुत असून यास प्रत्येकाने भेट द्यायला हवी. या प्रत्येकामध्ये एके दिवशी अमेरिकेच्या राष्ट्रपतींचाही समावेश असेल.

विशेष म्हणजे, पुढच्या महिन्यात पार पडणाऱ्या जी-७ शिखर संमेलनासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा जपानला येणार आहेत. परंतु ते हिरोशिमाला येणारे पहिले राष्ट्रपती ठरतील की नाही, याबाबत सांगण्यास केरी यांनी नकार दिला. केरी म्हणाले की, ओबामा या ठिकाणी राष्ट्रपतीच्या रूपात येतील की नाही हे सांगता येणार नाही. ओबामा यांचा कार्यकाळ यंदा वर्षअखेर संपुष्टात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाची निवडणूक असून पुढच्या वर्षी २० जानेवारी रोजी नवे राष्ट्रपती पदभार सांभाळतील.

उ. कोरियाची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी : उत्तर कोरियाने शनिवारी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. आपण अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम बनलो असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान आणि अमेरिकेने स्वतंत्रपणे उत्तर कोरियावर टीका केली आहे.

जी-७ शिखर संमेलनाची तयारी : जॉन केरी यांच्यासोबत या वेळी ७ देशांचे परराष्ट्रमंत्रीही उपस्थित होते. शिखर संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. अमेरिकेसोबत जी-७ देशांच्या ध्वजासमोर उभे ८०० जपानी नागरिक त्यांच्यापुढे असलेली उदासीनता दूर करण्याचा या वेळी प्रयत्न करत होते.
नेमके काय घडले होते हिरोशिमामध्ये
जपानच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी अमेरिकेच्या यूएस बी-२९ या क्षेपणास्त्राने हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. या बॉम्बला "लिटल बॉय' असे नाव देण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेल्या हिरोशिमा शांती घुमटाच्या वर सुमारे १८०० फूट उंचीवर हा बॉम्ब फुटला होता. त्यामुळे सुमारे ७० हजार नागरिक ठार झाले होते, तर किरणोत्सर्गामुळे १९४५ वर्षअखेरपर्यंत मृतांचा आकडा १ लाख ७० हजारांवर पोहोचला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी नागासाकी शहरावरही अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.
केरी यांच्या दौऱ्याचे महत्त्व
अमेरिका संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी २००८ मध्ये हिरोशिमा दौरा केला. अमेरिकेचे नेते शक्यतो या ठिकाणी येण्याचे टाळतात. त्यांच्या मते, दुसरे महायुद्ध संपुष्टात आणण्यासाठी या ठिकाणी अणुहल्ला करणे गरजेचे होते. परंतु त्या अणुहल्ल्याबद्दल आणि त्यातील मृतांची जबाबदारी स्वीकारून क्षमा मागण्याची त्यांची इच्छा नाही.