आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात कारखान्याची इमारत कोसळून 18 ठार, 100 जणांना सुखरूप वाचवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानमध्ये एका कारखान्याची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण ठार झाले. सुदैवाने बचाव कार्याला वेगाने सुरुवात करण्यात आल्यामुळे १०० जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले.

कारखान्याची इमारत कोसळण्याची घटना बुधवारी रात्री सुंदर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडली. कारखान्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्याच वेळी चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला. यात १८ जणांचा मृत्यू, तर ९६ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळपर्यंत ९९ जणांना वाचवण्यात यश आले होते. इमारत कोसळल्यामुळे अजूनही १०० जण ढिगाऱ्याखाली अडकलेले असावेत, असा बचाव पथकाचा दावा आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी धावले. आपल्या आप्ताचा मृत्यू जवळून पाहिल्याने शेकडो नागरिकांना टाहो फोडला. काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी नातेवाईक प्रयत्न करत होते. कारखान्याचे मालक राणा अशरफ यांचाही इमारत कोसळण्याच्या घटनेत मृत्यू झाला. पॉलिथीन बॅग्जची निर्मिती करणारा हा कारखाना आहे.

घात की अपघात ?
पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. घटनेमागे मानवी कट कारस्थान आहे का किंवा दुर्लक्ष कारणीभूत आहे का, याचा तपास करण्यासाठी शरीफ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बचाव कार्यात अडथळे
पाकिस्तानातील सुंदर इंडस्ट्रियल इस्टेट भागातील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर येथे मोठा ढिगारा निर्माण झाला आहे. तो ढिगारा दूर करून बचाव कार्याला वेग आणण्याचे काम सुरू आहे; परंतु लष्कर आणि बचाव पथकापुढे मोठ्या प्रमाणात अडथळे येऊ लागले आहेत.