आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराचीत हिंसाचार:अतिरेक्यांचा बसमध्ये अंदाधुंद गोळीबार, ४७ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तानच्या कराची शहरात बुधवारी पोलिसांच्या गणवेशात बाइकवर आलेल्या अतिरेक्यांनी एका बसमध्ये घुसून प्रवाशांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. गोळीबारात ४७ जणांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये १६ महिला आहेत. बसमध्ये ६० पेक्षा जास्त प्रवासी होते.

सिंध पोलिसचे महानिरीक्षक गुलाम हैदर जमाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा ते आठ अतिरेकी गोळीबार करून बेपत्ता झाले. हल्ला शिया इस्लाम समुदायाच्या नागरिकांवर निशाणा साधण्यासाठी करण्यात आला होता. अतिरेक्यांनी फेकलेल्या आयएसआयएसच्या पत्रकामध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. दहशतवादी गट जुंदुल्लाहनेही हल्ला केल्याचे म्हटले आहे. गलिस्तान-ए-जोहर परिसरातील डाऊ मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन आणि पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हल्ल्यानंतर लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी श्रीलंकेचा तीन दिवसांचा दौरा रद्द केला.

भारत पाकसोबत : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टि्वटरवर हल्ल्याचा निषेध केला. आम्ही पाकिस्तानी जनतेसोबत असल्याचे मोदी म्हणाले. ज्या बसवर हल्ला झाला ती इस्लामी समुदायाच्या एनजीओची होती. शिया समुदायावर जानेवारीनंतर हा दुसरा मोठा हल्ला आहे. जानेवारीत शिकारपूरमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ६१ जण ठार झाले होते.

शरीफ यांच्या अफगाण दौऱ्यानंतर हल्ला
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अफगाणिस्तान दौऱ्यावरून परतल्याच्या दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अफगाण दौऱ्यात अफगाणिस्तानचे शत्रू हे पाकिस्तानचेही शत्रू असल्याचे म्हटले होते. सिंधचे मुख्यमंत्री सईद कईम अली शहा यांनी हा दहशतवादी हल्ला ठरवला असून आरोपींना पिंजऱ्यात उभे केले, असे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

पाकिस्तानात २० टक्के शिया
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो आणि पाकिस्तान तहरिक-ए- इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांनी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अल्पसंख्याक शिया समुदायावर हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानमध्ये शियांची लोकसंख्या २० टक्के आहे.
दुसरीकडे, दक्षिण अफगाणिस्तानातील एका मशिदीत पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत १० जण ठार झाले. हेल्मंड प्रांतातील लष्कर गाह भागातील मशिदीत अतिरेक्यांनी कोणाला ओलीस ठेवले होते की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. बंदूकधारी दोन हल्लेखोर लष्कर गाहमधील गव्हर्नरांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी रोखले. यानंतर त्यांना नजीकच्या मशिदीत जाणे भाग पडले. पोलिसांनी मशिदीत केलेल्या कारवाईत तीन अतिरेक्यंाचा खात्मा झाला. मृतांमध्ये हेल्मंडच्या उलेमा काैन्सिलच्या प्रमुखाचा मृत्यू झाला असल्याचे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या कारवाईत दहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा हेल्मंडच्या आरोग्य विभागाचे प्रमुख इनायतुल्हाह गाफरी यांनी केला आहे. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. जखमी आठ जणांवर उपचार सुरू आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेची छायाचित्रे...