Home | International | Pakistan | Imran Khan Invites Aamir Khan, Sunil Gavaskar, Kapil Dev To Oath Ceremony As Pak PM

इम्रान खान यांचा 11 ऑगस्टला शपथविधी.. आमिर, गावस्कर, कपिलसह सिद्धूंना निमंत्रण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 08:35 PM IST

पीटीआय पक्षाचे प्रमुख आणि माजी क्रिकेटर इम्रान खान 11 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत.

 • Imran Khan Invites Aamir Khan, Sunil Gavaskar, Kapil Dev To Oath Ceremony As Pak PM

  इस्लामाबाद - पीटीआय पक्षाचे प्रमुख आणि माजी क्रिकेटर इम्रान खान 11 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी कार्यक्रमात त्यांनी प्रसिद्ध बॉलिवुड स्टार आमिर खान आणि दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, कपिल देवसह नवजोत सिंग सिद्धू यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरीक ए-इन्साफला 116 जागा मिळाल्या. तसेच हा पक्ष पाकिस्तानचा सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला.


  मीडियाचे भाकित खोटे ठरले...
  इम्रान खान आपल्या शपथविधी समारंभात सार्क देशांच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार अशी चर्चा आहे. मोदींनी सुद्धा इम्रान यांना दूरध्वनीवरून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पीटीआयचे प्रवक्ते फवाद हुसैन यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. त्यानुसार, "माध्यमांकडून अनेक प्रकारची भाकिते वर्तवली जात आहेत. त्यामध्ये पंतप्रधान शपथ विधी सोहळ्यात परदेशी नेत्यांना बोलावणार अशी चर्चा केली जात आहे. परंतु, माध्यमांचा हा तर्क खोटा आहे. यासंदर्भातील निर्णय परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा झाल्यानंतरच घेतला जाईल."

  पीटीआयला अशीही भीती
  पाकिस्तानी दैनिक डॉनच्या एका वृत्तानुसार, पीटीआयचे नेते शिरीन मजारी आणि शफाकत महमूद यांनी बुधवारी परराष्ट्र सचिव तहनिमा जन्जुआ यांची भेट घेतली. या भेटीत शपथविधी सोहळ्यात परदेशी नेत्यांना बोलावण्याबाबत चर्चा झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, पीटीआयचे नेते इम्रान खान मोदींसह सार्क देशांच्या नेत्यांना बोलावण्यास इच्छुक आहेत. परंतु, त्यांच्या कार्यक्रमात येण्यास मोदींनी नकार दिल्यास इम्रान यांच्यासाठी देशात मोठी डोकेदुखी ठरू शकते. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2014 मध्ये मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ सहभागी झाले होते. तसेच 15 डिसेंबर 2015 रोजी मोदींनी अफगाणिस्तान दौऱ्यावरून भारतात येताना पाकिस्तानला जाऊन शरीफांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Trending