Home | International | Pakistan | Imran Khan May Get In Trouble With The Issue Of New Pakistan

इम्रान यांच्या New Pakistan पुढे भ्रष्टाचार-बेरोजगारीचे सर्वात मोठे आव्हान, भारताशी संबंधांवर लष्कर सांगेल तसे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 27, 2018, 05:24 PM IST

इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता थोडीशी मदत मिळाली की, पीएम बनणे निश्चित आहे.

 • Imran Khan May Get In Trouble With The Issue Of New Pakistan
  - नवाझ शरीफ यांच्या पक्षाला कमी समजणे इम्रान यांची घोडचूक ठरेल.
  - देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारणे डोकेदुखी ठरण्याची शक्यता.

  इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा - सर्वसाधारण निवडणुकीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता फक्त बाहेरून थोडीशी मदत मिळाली की, पीटीआय प्रमुख इम्रान यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे. परंतु, येथून इम्रान यांचा प्रवास खडतरच असेल. ज्या ‘न्यू पाकिस्तान’चे वचन इम्रान यांनी जनतेला दिले आहे, त्यापुढील सर्वात मोठे आव्हान हे भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कमजोर अर्थव्यवस्था आहे. भारताशी संबंध आणि काश्मिर प्रश्नाबाबत बोलायचे झाल्यास, यात इम्रान यांचे विचार महत्त्वाचे नाहीत, कारण ही धोरणे पाक लष्करच ठरवणार.

  अडचणी फक्त एवढ्याच नाहीत. नवाझ शरीफ भलेही जेलमध्ये बंद आहेत, परंतु त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्यांदा निवडणूक लढत असलेल्या शहबाज भुट्‌टोंचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सदनात विरोधक दुबळा नसेल, ते अनेक आव्हाने देत राहतील.

  निकालांनी बदलले राजकीय गणित:
  इम्रान 22 वर्षांपासून पाकिस्तानच्या राजकारणात आहेत आणि वजीर-ए-आझम बनण्याची त्यांची इच्छा आहे. सुरुवातीला लोक त्यांची खिल्ली उडवायचे. एवढेच काय, त्यांच्या म्हणण्याला महत्त्वही दिले जात नव्हते. परंतु, 2018 च्या सर्वसाधारण निवडणुकीतील निकालांनी पाकिस्तानातील राजकीय गणिते पूर्णत: बदलली आहेत. यात 30 वर्षे जुन्या राजकीय शक्ती- कराचीतील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) अचानक कमजोर झालेली दिसली. यामुळे हे पाकिस्तानातील राजकारणाचे नवे युग असल्याचे वाटते.


  इम्रान यांना स्वत:च्याच रणनीतीचा करावा लागेल सामना:
  ज्या मुद्द्यांवर इम्रानने जुन्या सरकारला आतापर्यंत घेरले होते, आता त्याच मुद्द्यांवर विरोधकांना उत्तर द्यावे लागू शकते. 2013 मध्ये निवडणुकीनंतर ते सातत्याने म्हणत होते की, निवडणुकीत घोटाळा झाला. माझ्यावर अन्याय झाला. यावरून त्यांनी धरणे दिले. भ्रष्टाचार, बेरोजगारीवर त्यांनी अनेकदा निदर्शने केली. निवडणुकीत घोटाळा आणि अन्यायाची बाब पीएमएल-एन आतापासूनच म्हणत आहे. इतर मुद्द्यांवर विरोधकही एकत्र झाले, तर इम्रान यांच्यापुढे मोठी अडचण उभी राहील. अर्थव्यवस्थेचा मुद्दा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. टेरर फायनान्सच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचे नाव केव्हाच नमूद झाले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर ते ब्लॅक लिस्टेडही होऊ शकतात. तरुणांना दिलेली वचने इम्रान यांच्यासाठी तिसरे आव्हान आहे. त्यांच्या विजयात नव्यानेच मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणांचा मोठा वाटा आहे. ते भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्याच्या इम्रान यांच्या वचनामुळे घराबाहेर मतदानासाठी पडले होते.


  भारताबद्दलच्या दृष्टिकोनामुळे फरक पडत नाही:
  इम्रान हे भारताबद्दल सकारात्मक राहोत अथवा नकारात्मक, यामुळे काहीही फरक पडणार नाही. पाकिस्तानात 3 वेळा पंतप्रधान बनलेले नवाझ शरीफ नेहमी भारताशी मैत्रिपूर्ण संबंधांबाबत बोलायचे. परंतु, जेव्हाकेव्हा त्यांनी भारताशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना हटवण्यात आले. या वेळी निवडणुकीतही ‘भारत का दोस्त’ असे सांगून शरीफ यांच्यावर निशाणा साधण्यात आला. या मुद्द्यावर पाकिस्तानी लष्कराचेच म्हणणे पुढे रेटावे लागते. जर इम्रान त्याविरुद्ध गेले, तर त्यांच्यासाठी अडचणी तयार होऊ शकतात.

  तगड्या विरोधकांपासून राहावे लागेल सावध:
  ही बिलावल भुट्टो यांची पहिली निवडणूक होती. लोकांचा अंदाज होता की, त्यांच्यात बेनझीर यांच्यासारखी जादू नाही. परंतु त्यांच्या पक्षाने उत्तम कामगिरी केली. सिंध प्रांतात आपला दबदबा कायम ठेवला. सर्वसाधारण निवडणुकीत 2013 च्या 31 जागांच्या तुलनेत 2018 मध्ये 42 जागांवर विजय मिळवला. ते तरुण आहेत आणि त्यांची बोलण्याची पद्धत पाकिस्तानी ढंगापेक्षा एकदम वेगळी.. शालीन आहे. जर इम्रान यशस्वी झाले नाहीत, तर तरुणांची नजर त्यांच्यावर टिकू शकते. दुसरीकडे, शरीफ खानदानाचे राजकारणा संपले, असे मानता येत नाही. त्यांचा पक्ष खूप जागी पराभूत झाला आहे, परंतु खूप जागी जिंकलाही आहे. अशा वेळी ते मजबूत विरोधक म्हणून इम्रान यांना टक्कर जरूर देतील.

Trending