Home | International | Pakistan | imran khan says he will take oath as pakistan prime minister on august 11

इम्रान खानच ११ ऑगस्टला घेणार पाकच्या पंतप्रधानपदाची शपथ; बहुमतासाठी धावाधाव सुरू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 09:26 AM IST

पीटीआयकडे नॅशनल अॅसेंबलीमध्ये 116, पीएमएल-एनच्या 64 आणि पीपीपीच्या 43 जागा आहेत.

 • imran khan says he will take oath as pakistan prime minister on august 11

  पेशावर- आपण ११ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहोत, असे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान यांनी म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतीय सभेच्या सदस्यांना संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे.


  सदस्यांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, मी खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित केले असून त्याबाबतची घोषणा पुढील ४८ तासांत होईल. याबाबत मी जे काही ठरवले असेल ते लोकांच्याच हिताचे असेल. सिंधच्या अंतर्गत भागातील गरिबीचे निर्मूलन करणे याला माझ्या सरकारचे प्राधान्य असेल.


  पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीच्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पीटीआय हा पक्ष ११६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाला (पीएमएल-एन) ६४ तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र साध्या बहुमतासाठी १३७ जागांची गरज असून त्यासाठी पीटीआयला २२ जागा कमी पडल्या आहेत. त्यामुळे अपक्षांनी आपल्या पक्षात यावे यासाठी इम्रान खान त्यांची मनधरणी करत आहेत. बहुमत जमा करण्यासाठी पीटीआयच्या नेतृत्वाने मुत्ताहिदा काैमी मूव्हमेंट-पाकिस्तान, ग्रँड डेमॉक्रॅटिक अलायन्स, पीएमएल-कैद आणि बलुचिस्तान अवामी पक्ष या लहान पक्षांशी संपर्क साधला असल्याचे वृत्त आहे.


  'मजबूत' विरोधी पक्षासाठी पीएमएल-एन, पीपीपीची हातमिळवणी
  दुसरीकडे, 'मजबूत' विरोधी पक्ष तयार करण्यासाठी हातमिळवणी करण्याचा निर्णय पीएमएल-एन आणि पीपीपी यांनी घेतला आहे. त्यामुळे इम्रान यांच्या पीटीआयला कडव्या आव्हानांचा सामना मिळण्याची शक्यता आहे. 'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राने सोमवारी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, दोन्ही पक्षांमध्ये समन्वित संयुक्त रणनीती तयार करण्यास सहमती दर्शवली आहे. या दोन्ही पक्षांची रविवारी यासंदर्भात बैठक झाली. बैठकीनंतर पीएमएल-एनचे नेते मुशाहिद हुसेन सय्यद यांनी सांगितले की, या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे एकमत आहे. त्यामुळे अशा निवडणूक निकालांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून 'समन्वित संयुक्त विरोधी रणनीती' तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेत पीटीआयच्या सरकारसमोर कडवे आव्हान देता यावे यासाठी हा हेतू आहे.


  अफगाण अध्यक्षांचे इम्रान यांना काबूल दौऱ्याचे निमंत्रण
  अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी इम्रान खान यांना काबूलला येण्याचे निमंत्रण दिले आहे. गनी यांनी रविवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी इम्रान यांना खुले निमंत्रण दिले आहे आणि त्यांनी लवकरच काबूलला येण्याची इच्छा दर्शवली आहे.


  'पीटीआय सरकार आल्यास देशाचे आर्थिक भविष्य बरबाद'
  कुठलाही अनुभव नसलेल्या पीटीआय या पक्षाने देश चालवला तर देशाचे आर्थिक भविष्य बरबाद होईल, अशी टीका पीएमएल-एनने केली आहे. या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे की, निवडणूक निकालात घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करावा आणि मतदानाच्या दिवसाच्या घटनांवर एक श्वेतपत्रिका जारी करावी, अशी आमची मागणी आहे.

Trending