आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा पाकला धोका नाही, मन वळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न- पाकिस्तानचे संरक्षणमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- भारताचा काहीही धोका नाही. रणनीतीच्या पातळीवर पाकिस्तानने भारताविषयीची भूमिका बदलली पाहिजे, असे सांगून अमेरिकेने मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी केला आहे.  


सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आता अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंधदेखील तणावाखाली आहेत. परंतु चर्चेतून त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. परंतु अमेरिका भारताच्या आक्रमक वागण्याकडे कानाडोळा करत आहे. ही खेदाची बाब असल्याचे दस्तगीर यांनी सांगितले. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ भारताच्या हालचाली अत्यंत आक्रमक आहेत. असे असूनही भारताचा पाकिस्तानला काहीही धोका नाही. उलट पाकिस्तानने आपल्या रणनीतीच्या पातळीवर भूमिकेत बदल करण्याची गरज आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेने कितीही मन वळवण्याचे प्रयत्न केले तरी सत्य बदलत नाही. ते अढळ असल्याचा कांगावा दस्तगीर यांनी केला आहे. भारताची लष्करी क्षमता वाढत चालली आहे. भारताने सैनिकांत वाढ केली आहे. साहित्य-सामग्रीतही भारताने वाढ केली आहे. असा आरोप दस्तगीर यांनी केला आहे.  

 

उलट्या बोंबा..  
सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरी, दहशतवादाची भारताला  झळ बसली आहे. परंतु पाकिस्तानने उलट भारताच्या विरोधात पवित्रा घेतला.  पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर आपल्याविराेधात केला जात असल्याचा आरोप केला. हे रोखले पाहिजे, अशा बोंबाही पाकिस्तानने मारल्या आहेत.  

 

 

अतिरेक्यांचे नंदनवन मुळीच  नाही, विरोधी कडक कारवाई सुरू 
अमेरिकेसह भारतानेदेखील पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन बनले आहे, असे म्हटले होते. त्या आरोपाचे दस्तगीर यांनी खंडन केले. देशात अशा प्रकारचे नंदनवन मुळीच नाही. सरकारने तर दहशतवाद्यांच्या विरोधात झर्ब-ए-अज्बसारख्या मोहिमा सुरू केल्या. त्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानात २००१ पासून सुरू असलेल्या विविध हिंसाचारांत हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. म्हणूनच  अशा प्रकारच्या बलिदानाचे स्मरण सर्वांनी करायला हवे, असे दस्तगीर यांनी सांगितले.  

 

कोलंबो ; बाजवांची श्रीलंकेसोबत खलबते 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा मंगळवारी श्रीलंकेच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यात ते राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे व त्यांचे समकक्ष महेश सेनानायके यांचीही भेट घेऊन चर्चा करतील. उभय देशांच्या हितसंबंधांवर ही चर्चा अपेक्षित असले तरी श्रीलंका-पाकिस्तान-चीन जवळीक वाढू लागली आहे. त्यामुळे या खलबतांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

बातम्या आणखी आहेत...