Home | International | Pakistan | Nawaz Sharif sentenced 10 years and Maryam 7 years in Avenfield case

PAKISTAN : माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 10 वर्षे, मुलगी मरियमला 7 वर्षांच्या कैदेची शिक्षा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 07, 2018, 08:07 AM IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अॅव्हेनफिल्ड घोटाळा प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 • Nawaz Sharif sentenced 10 years and Maryam 7 years in Avenfield case

  इस्लामाबाद- भ्रष्टाचाराच्या कमाईतून लंडनमध्ये चार फ्लॅटची खरेदी केल्या प्रकरणी दोषी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अकाउंटेबिलिटी न्यायालयाने शुक्रवारी १० वर्षांची कैद ठोठावली. त्यांची मुलगी व सहआरोपी मरियमला ७ वर्षांची तर जावई मोहंमद सफदर यास एक वर्षाचा तुरुंगवास झाला आहे. नवाझ यांना सुमारे ७३ कोटी व मरियमला १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. दोघांनाही आता निवडणूक लढवता येणार नाही. न्यायालयाने लंडनच्या अॅवेनफील्ड अपार्टममेंटमधील चार फ्लॅट देखील जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.


  पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक १९ दिवस राहिलेले असताना न्यायालयाने हा निवाडा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले शरीफ यांनी गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशामुळे पद सोडले होते. त्यांना आजारी पत्नी कुलसूमच्या देखरेखीसाठी कधी लंडन तर कधी न्यायालयात चकरा माराव्या लागल्या होत्या. मरियमनेही लंडन वाऱ्या केल्या होत्या.


  प्रकरण असे आहे : ३ खटले दाखल, २ मध्ये निर्णय बाकी
  नवाझ कुटुंबाने चार फ्लॅट १९९३ मध्ये खरेदी केले होते. त्याबाबतची माहिती २०१६ मध्ये उजेडात आली होती. पनामा पेपर्समुळे याबद्दल भंडाफोड झाला होता. या प्रकरणात नवाझ यांच्या विरोधात एकूण तीन खटले दाखल झाले. त्यापैकी दोन खटल्यांचा निकाल बाकी आहे. अकाउंटेबिलिटी न्यायालयाने पूर्वी चार वेळा निकाल स्थगित केला होता. कडक सुरक्षा व्यवस्थेखाली न्यायमूर्ती मोहंमद बशीर यांनी शुक्रवारी बंद खोलीत १०० पानांचा निकाल दिला.


  नवाझ, मुलगी, जावई निवडणूक लढण्यास अपात्र, मुले फरार
  सर्वोच्च न्यायालयाने नवाझ यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. त्यांची उत्तराधिकारी मरियम व सफदरही निकालानंतर निवडणूक लढवू शकणार नाहीत. मुलगा हसन व हुसैनही सहआरोपी आहे. ते फरार आहेत.


  मुलगी-वडील सध्या लंडनमध्ये, परतण्याबाबत अनिश्चितता
  ६८ वर्षीय नवाझ शरीफ व त्यांची मुलगी मरियम लंडनमध्ये आहेत. पत्नी कुलसूम यांच्या घशावर कर्करोगाचा उपचार सुरू आहे. दोघांनाही तुुरुंगात जावे लागणार असल्याने सहानुभूतीचा फायदा घेण्याची शक्यता आहे, असे विश्लेषकांना वाटते.


  पळून जायला मी काही हुकूमशहा नाही : शरीफ
  नवाझ व मरियम १४ जून पासून लंडनमध्ये आहेत. नवाझ यांनी निर्णय होण्यापूर्वी सात दिवसांची सवलत मागितली होती. परंतु न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. न्यायालयाच्या कक्षात उभे राहून निकाल ऐकू इच्छितो, असे तेव्हा नवाझ यांनी पत्रकारांना सांगितले होते. मी मुलगी मरियमसोबत १०० हून जास्त सुनावणीला हजर राहिलो आहे. मुशर्रफ यांच्यावर टीका करताना त्यांनी- 'मी काही पळून जायला हुकूमशहा नाही.', असे म्हटले होते. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांनी त्यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती.

Trending