इम्रान यांच्या शपथविधीसाठी विदेशी नेत्यांना निमंत्रण नाही; साधेपणाने होणार समारंभ
इम्रान खान यांच्या शपथविधी कार्यक्रमात पीएम नरेंद्र मोदींसह कुठल्याही परदेशी नेत्याला बोलावले जाणार नाही.
-
इस्लामाबाद- पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांना आपला शपथविधी समारंभ साधेपणानेच करायचा अाहे, त्यामुळे त्यांनी समारंभासाठी विदेशी नेते आणि सेलिब्रिटी यांना न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त ‘द डॉन’ या वृत्तपत्राने दिले आहे.
निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या मदतीने ते सत्ता स्थापन करतील. ११ ऑगस्टला ते पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या पक्षाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि कपिलदेव, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू या भारतीय क्रिकेटपटूंना समारंभासाठी निमंत्रण देण्याची योजना याआधी आखली होती. मात्र, इम्रान यांनी आता आपली योजना बदलली असून शपथविधी समारंभ साधेपणाने करण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनुसार, इम्रान खान राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात शपथ घेतील. समारंभासाठी कुठल्याही विदेशी नेत्यांना बोलावण्यात येणार नाही. इम्रान खान यांच्या अगदी जवळच्या मोजक्या विदेशी मित्रांनाच या समारंभाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. यात नवज्योतसिंग सिद्धूचा समावेश असेल.
केंद्राची परवानगी मिळाल्यास पाकला जाणार : सिद्धू
चंदिगड : केंद्र सरकारने परवानगी दिल्यास मी इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभाला जाणार, हा मोठा सन्मान आहे, अशी भावना पंजाबचे मंत्री आणि भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी गुरुवारी व्यक्त केली. सिद्धू म्हणाले की, खेळाडू सर्व अडथळे मोडतात, ते लोकांना एकत्र करतात, असे माझे वैयक्तिक मत आहे. मी इम्रान यांच्यात एक श्रेष्ठ खेळाडू पाहिला आहे. ते पंतप्रधान झाल्यास दोन्ही देशांतील संबंध सुधारतील, अशी माझी अपेक्षा आहे.