Home | International | Pakistan | Reasons behind success of Imran khan in Politics of Pakistan

या 5 गोष्टींमुळे पाकिस्तानी जनतेवर गारूड करण्यात यशस्वी ठरला इम्रान, वाचा यशामागचे समीकरण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 02:58 PM IST

पाकिस्तानी जनतेकडून इम्रान यांना मिळालेला हा पाठिंबा म्हणजे, भ्रष्टाचाराच्या विरोधात विकासाला निवडल्याचे म्हटले जातेय.

 • Reasons behind success of Imran khan in Politics of Pakistan

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाला आणि एकूणच त्यांना मिळालेल्या यशाची अनेक कारणे आहेत. इम्रान खान यांनी अगदी व्यवस्थित व्यूहरचना करून पाकिस्तानच्या राजकारणात हे यश संपादन केले आहे. पाकिस्तानी जनतेकडून इम्रान खान यांना मिळालेला हा पाठिंबा म्हणजे, भ्रष्टाचाराच्या विरोधात विकासाला निवडले असल्याचे म्हटले जात आहे. जगात प्रथमच एखादा क्रिकेटपटून एका देशाचा प्रमुख बनणार आहे. पण त्यासाठी इम्रान खान यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. नेमकी त्यांनी पाकिस्तानी जनतेवर काय जादू केली किंवा त्यांच्या यशामागचे नेमके कारण काय हे आपण आज जाणून घेणार आहोत.


  देशभक्त म्हणून प्रतिमा निर्माण केली
  इम्रान खानने स्वतःची प्रतिमा देशभक्त अशी तयार केली. त्यांनी अगदी उघडपणे मते मांडली. विशेषतः भारतविरोधी वक्तव्ये करत त्यांनी लोकांचे लक्ष वेधले. शरीफ भारताचे कसे लाडके होते, हेही त्यांना दाखवून दिले. तसे करतानाच आपण किती देशभक्त आहोत, हे त्यांनी लोकांना वारंवार सांगितले.


  स्वच्छ प्रतिमेसह भ्रष्टाचाराला विरोध
  पाकिस्तानातील सध्याचा सर्वात मोठा मुद्दा आहे भ्रष्टाचार. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्यांच्या मुलीसह भ्रष्टाचाराच्या कारणावरून तुरुंगवास झाला आहे. इम्रान खान यांनी हा मुद्दा प्रचारात चांगलाच भाजून घेतला. त्याआधीही त्यांना नवाज शरीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रान पेटवले होते. दुसरीकडे त्यांची स्वतःची प्रतिमा मात्र स्वच्छ नेत्याची आहे.


  तरुणांवर केले गारूड
  पाकिस्तानात बेरोजगारी आणि परिणामी गरीबी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे विकासाचे स्वप्न दाखवतानाच इम्रान यांनी तरुणांनाही आकर्षित करण्यात यश मिळवले. क्रिकेटपटू असल्याने आधीच इम्रान यांचा तरुणांवर भरपूर प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या आश्वासनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


  लष्कर, कट्टरतावाद्यांचा पाठिंबा
  या निवडणुकीत इम्रान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पार्टीला लष्कर आणि कट्टरतावाद्यांचा उघड पाठिंबा मिळाला. लष्कराची पहिली पसंती इम्रान यांना असल्याचे सांगितले जातेय. कदाचित त्यामुळेच इम्राननेही निवडणूक प्रचारात लष्कराच्या विरोधात चकार शब्दही काढलेला नाही. उलट शरीफ यांनी लष्करावर केलेल्या टीकेचा वापर त्यांनी शरीफ यांच्याच विरोधात केला.


  घराणेशाहीच्या मुद्द्याचा योग्य वापर
  पाकिस्तानात अनेक वर्षे भुत्तो आणि शरीफ कुटुंबाकडे सत्ता राहिली आहे. या मुद्द्याचा वापर इम्रान खान यांनी अगदी योग्यपणे केला. घराणेशाहीपासून पाकिस्तानची सुटका होणे गरजेचे असल्याचे त्यांनी मतदारांना ठासून सांगितले. त्यात त्यांना यशही आल्याचे दिसते.

Trending