आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या सीमाभागात रशियाने केली मानद सल्लागाराची नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर- पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवर रशियाने आपल्या मानद सल्लागाराची नियुक्ती केली आहे. इस्लामाबादशी रशियाचा संपर्क घनिष्ठ होत असल्याचे स्पष्ट संकेत यामुळे मिळत आहेत. विशेष म्हणजे अति संवेदनशील असलेल्या आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांनी चर्चेत आलेल्या खैबर पख्तुनख्वा राज्यात रशियाने आपल्या मानद सल्लागाराची नियुक्ती केली आहे. अर्साला खान यांना या पदावर नियुक्त केले आहे. वायव्य पाकिस्तान नेहमीच पाक-अफगाण संबंधांची दुखती नस असलेला प्रांत राहिला आहे. येथूनच अफगाणिस्तानच्या बहुतांश दहशतवादी कारवायांची सूत्रे हलवली जातात. अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधात कटुता निर्माण होत असताना रशियाने या पदाच्या नियुक्तीची घोषणा केली आहे, हेदेखील सूचक आहे.  

मंगळवारी खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या एका कार्यक्रमात अर्साला खान यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. राज्यपाल इक्बाल जाफर झागरा यांनी या वेळी म्हटले की, रशिया - पाकिस्तान राजनयिक संबंधांचा हा नवा अध्याय ठरेल. 

 
इसिस जम बसवत आहे : रशिया
अफगाणिस्तानच्या नानगारहार राज्यात इसिस जम बसवत आहे, असे रशियाने म्हटले आहे. त्यामुळे सीमा प्रदेशात मानद सल्लागार कार्यालयाची गरज आहे, अशी सबब रशियाने दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला सैनिकी निधी पुरवण्यास नकार दिल्यानंतर ही संधी रशियाने साधली आहे. अफगाणमधील तालिबान्यांना पाक प्रशिक्षण देत असल्याबद्दल अमेरिका व अफगाणिस्तान सरकारने टीका केली होती. आता रशियाचा येथील थेट प्रवेश नाट्यमय ठरला आहे.  

दहशतवाद्यांना आश्रयप्रकरणी दिला ३ महिने अवधी : अासिफ  
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सची (फाटा) बैठक या आठवड्यात झाली. अमेरिकेने पाकिस्तानवर लावलेल्या आरोपांची चर्चा येथे होणे अपेक्षित होते.  पाक दहशतवाद्यांना आश्रय व प्रशिक्षण देतो, असा अमेरिकेचा आरोप आहे. पाकला ‘ग्रे लिस्ट’ देशांत टाकण्याची मागणी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन व जर्मनीने केली आहे. पाकच्या पंतप्रधानांचे सल्लागार डॉ. मिफतह इस्माईल यांनी पाकचे प्रतिनिधित्व केले.  ग्रे लिस्टमध्ये टाकण्यापूर्वी फाटाने पाकिस्तानला ३ महिन्यांची मुदत दिली आहे, असा दावा परराष्ट्रमंत्री ख्वाजा अासिफ यांनी केला.  फाटाच्या बैठकीत विविध देशांचे ७०० प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

अमेरिका - रशिया संबंध सुधारणे महाकठीण : सर्गेई रयाबकोव्ह  

अमेरिका-रशिया संबंध सुधारणे महाकठीण असल्याचे मत रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव्ह यांनी व्यक्त केले आहे. शीतयुद्धादरम्यानची स्थिती आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात रशियाचा हस्तक्षेप हे दोन्ही मुद्दे उभय मैत्रीसाठी घातक आहेत. त्यात आता सिरिया आणि युक्रेन वादाची भर पडली आहे, असे सेर्गेई म्हणाले. पुढच्या महिन्यात रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. त्यात अमेरिका नाहक हस्तक्षेप करत असल्याचा आरोप सेर्गेई यांनी लावला आहे. १८ मार्च रोजी रशियात अध्यक्षपदासाठी मतदान होईल.  

 

बातम्या आणखी आहेत...