आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावरच्या सभेत आत्मघाती हल्ला; उमेदवारासह २१ ठार, उमेदवाराच्या मुलासह ६९ जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुलैच्या सुरुवातीला खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका बॉम्बस्फोटात उमेदवारासह 7 जखमी झाले होते.

 

पेशावर- पाकिस्तानमध्ये २५ जुलैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. देशात ३७ हजार जवान तैनात असतानाही पेशावरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा अवामी नॅशनल पार्टीच्या (एएनपी) निवडणूक सभेत आत्मघाती हल्ला झाला. त्यात २१ जण ठार तर ६९ जण जखमी झाले. स्फोटात ठार झालेल्यांत एएनपीचे नेते हारुण बिलौर यांचा समावेश आहे. ते पेशावरच्या पीके-७८ मतदारसंघातून प्रांतीय उमेदवार होते. हल्ल्याच्या वेळी ते सभेला संबोधित करण्यास निघाले होते. ते मंचावर पोहोचताच हल्लेखोराने स्वत:ला उडवले. जखमींमध्ये हारुण यांच्या १६ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. हल्ल्यात ८ किलो डायनामाइटचा वापर करण्यात आला. हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी संस्थेने दक्षतेचा इशारा दिल्यानंतर एक दिवसानंतर झाला. हारुण यांचे वडील बशीर अहमद हेही २०१२ च्या अशाच आत्मघाती हल्ल्यात ठार झाले होते. एएनपीचे खैबर पख्तुनख्वा प्रांतात २००८ ते २०१३ पर्यंत सरकार होते. 


नवाझ, मरियम यांना पाकमध्ये येताच अटक होणार; एसी, फ्रिज मिळणार नाही 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर ते देशात परतण्याची प्रतीक्षा आहे. लाहोरला पोहोचताच त्यांना अटक केली जाईल. 'डॉन' या वृत्तपत्रानुसार माजी संसद सदस्य असल्याने नवाझ यांना लाहोर तुरुंगात चांगल्या वर्गाच्या कोठडीत ठेवले जाईल. मरियम यांना लक्झरी सुविधा हव्या असतील तर वार्षिक ६ लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्राप्तिकर भरतो हे सिद्ध करावे लागले. मात्र, त्यांना एसी किंवा फ्रिज मिळणार नाही. नवाझ यांचे जावई कॅ. मो. सफदर अवान (सेवानिवृत्त) सध्या रावळपिंडी तुरुंगात आहे. पनामा प्रकरणात शरीफ कुटुंबाला सत्ता गमवावी लागली. 


पाकच्या पहिल्या शीख अधिकाऱ्यावर हल्ला, पगडी ओढून घरातून काढले 
पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले थांबले नाहीत. नवे प्रकरण पाकचे पहिले शीख पोलिस अधिकारी गुलाबसिंग यांचे आहे. लाहोरमध्ये मंगळवारी घरात घुसून त्याना मारहाण केली. सिंग यांनी सांगितले की, लाहोरच्या डेरा चहल भागातून त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले, पगडीही काढली. मला किमान १० मिनिटांचा वेळ द्यावा, अशी विनंती गुलाबसिंग यांनी पोलिसांना केली. ते तेथे १९४७ पासून राहत आहेत. पण त्यांच्या म्हणण्याकडे लक्षच दिले नाही. गेल्या महिन्यातच शीख कार्यकर्त्याची हत्या झाली होती. 


सर्व नेत्यांना कडक सुरक्षा द्या : पीटीआय प्रमुख इम्रान खान 
हल्ला करणाऱ्या पाक तालिबान या दहशतवादी संघटनेने म्हटले की, एएनपीच्या शासनकाळात आमच्या लोकांच्या झालेल्या हत्यांचा हा बदला आहे. पाकचे निवडणूक आयुक्त सरगार मोहंमद रजा म्हणाले की, ही आमच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान म्हणाले की, बिलौर यांचा मृत्यू दु:खदायक आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांना कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी. 

बातम्या आणखी आहेत...