Home | International | Pakistan | Malala Yousafzai Arrives In Pakistan Nearly After 6 Years Since Taliban Attack

मलाला 6 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भेटीवर; 4 दिवस कडेकोट सुरक्षा

वृत्तसंस्था | Update - Mar 30, 2018, 03:39 AM IST

6 वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानात परतली मलाला; तालिबानने केला होता जीवघेणा हल्ला

 • Malala Yousafzai Arrives In Pakistan Nearly After 6 Years Since Taliban Attack

  इस्लामाबाद - मलाला युसूफझाई हिचे पाकिस्तानमध्ये आगमन झाले असून पाकिस्तान सरकारने तिचे सहर्ष स्वागत केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने पुढाकार घेतला होता. त्यामुळे तिला तालिबानी दहशतवाद्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. तालिबान्यांच्या हल्ल्यातून बचावल्यानंतर तिने परदेशात आश्रय घेतला होता. मलाला युसूफझाई ही सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे.


  पाकिस्तानात आगमन झाल्यानंतर मानवी हक्क कार्यकर्ती मलालाने पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींची भेट घेतली. अब्बासींच्या कार्यालयात या वेळी अनेक उच्चपदस्थ उपस्थित होते. सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाने यासंबंधी ट्विट केले आहे. ‘गुल मकाई’ मलालाचे पाकिस्तानात स्वागत आहे, असे ट्विट पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. येथील एका लोककथेत ‘गुल मकाई’ हे पात्र प्रचंड लोकप्रिय असल्याने ही उपमा दिली आहे.

  पालकांसह आलेल्या मलालाचे विमानतळावर भव्य स्वागत

  मलाला सध्या २० वर्षांची आहे. तालिबान्यांच्या भूमिकेत फरक पडलेला नाही. त्यामुळे मलालाच्या ४ दिवसीय पाक भेटीदरम्यान कडेकोट सुरक्षा देण्यात आली आहे. तिच्या पालकांसोबत ती पाकमध्ये दाखल झाली. बेनझीर भुत्तो आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचे स्वागत करण्यात आले. तिच्या वेळापत्रकासंबंधी कमालीची गुप्तता राखण्यात आली आहे. मलाला फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील तिच्यासोबत आहेत. ‘मीट द मलाला’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  वायव्य पाकला भेट देण्याविषयी स्पष्टता नाही

  मलाला ही मूळची वायव्य पाकिस्तानच्या स्वात येथील आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये शाळेतून परतत असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या वेळी ती १४ वर्षांची होती. तिला त्वरित वैद्यकीय उपचार मिळाल्याने ती बचावली होती. हेलिकॉप्टरने तिला चांगल्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले होते. कोमामध्ये असताना तिला रुग्णवाहिका विमानाने ब्रिटनला पाठवण्यात आले. मलाला बचावली तर आम्ही पुन्हा तिच्यावर हल्ला करू, असे प्रसिद्धिपत्रक त्या वेळी तालिबानी संघटनेने काढले होते. २०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिला शैक्षणिक योगदानासाठी शांततेचे नोबेल प्रदान करण्यात आले.

  मलाला फंडद्वारे मदत

  तालिबान्यांच्या धमक्यांमुळे मलालाने ब्रिटनमध्ये शिक्षण सुरू ठेवले. पाकिस्तानात परतण्याचे मार्ग तिला बंद झाले होते. मलाला फंड या संस्थेद्वारे पाकिस्तान, नायजेरिया, जॉर्डन, सिरिया, केनिया येथील शैक्षणिक विकासासाठी निधी पुरवला जातो. सध्या ती ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेत आहे. संयुक्त राष्ट्राने तिला एप्रिल २०१७ मध्ये शैक्षणिक शांतिदूत म्हणून नियुक्त केले आहे.

  ११ व्या वर्षीपासून सक्रिय

  मलालाने वयाच्या ११ व्या वर्षीपासून शिक्षणाचा प्रसार सुरू केला होता. बीबीसीच्या उर्दू सेवेसाठी २००९ पासून ती लेखन करत आहे. तालिबान्यांच्या दहशतीखालील स्वातविषयी ती लेखन करत होती. २००७ पासून तालिबान्यांचे स्वातमध्ये वर्चस्व होते. मुलींचे शिक्षण त्यांनी बंद केले होते. महिलांच्या सार्वजनिक संचारावरदेखील येथे निर्बंध घातले होते.

 • Malala Yousafzai Arrives In Pakistan Nearly After 6 Years Since Taliban Attack
 • Malala Yousafzai Arrives In Pakistan Nearly After 6 Years Since Taliban Attack

  पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, मलाला रात्री उशीरा 1.41 वाजता इस्लामाबादच्या बेनजीर भुट्टो इंटरनॅशनल एअरपोर्टवर दाखल झाली.

 • Malala Yousafzai Arrives In Pakistan Nearly After 6 Years Since Taliban Attack

  पाकिस्तानात उपचार शक्य नसल्याने तिला ब्रिटनच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच ठिकाणी यशस्वी उपचारानंतर तिच्यासह कुटुंबियांनाही आश्रय देण्यात आला.

Trending